World Cup 2023 : विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअवर सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताची प्लेईंग 11 कशी असेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरणार असल्याची हिंट दिली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कांगारुची कोंडी करण्यासाठी अश्विन मैदानात उतरणार हे निश्चित झालेय. पण चेन्नईच्या मैदानावर अश्विन किती मोठा गेम चेंजर ठरु शकतो, याबाबत जाणून घेऊयात..
विश्वचषकासाठी भारताच्या 15 शिलेदारांची घोषणा झाली, तेव्हा आर. अश्विन याचा संघात समावेशही नव्हता. पण आशिया चषकादरम्यान अक्षर पटेल याला दुखापत झाली. त्यानंतर टीम इंडियामध्ये अश्विनची एन्ट्री झाली. अश्विन फक्त 15 जणांच्या चमूमध्येच राहणाार नाही, तर प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार आहे.
अश्विन का ठरणार गेम चेंजर?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महामुकाबला चेन्नईच्या चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईची खेळपट्टी काळ्या मातीने तयार झाली आहे. आजही त्याच खेळपट्टीवर सामना होणार आहे. ही खेळपट्टी थोडी संथ आहे, अशा स्थितीत फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यात अश्विनचा घरच्या मैदानावर खेळत आहे. त्याला खेळपट्टीची चांगली जाण आहे, त्याचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो.
चेपॉक हे अश्विनचे होम ग्राऊंड आहे, तो खेळपट्टीचा रंग चांगल्या पद्धतीने ओळखतो. त्याचा सर्वोच्च उपयोग भारतीय संघ करेल. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या मनात अश्विनची भीती आहे. अश्विनचा सामना कांगारुना करताना संघर्ष करावा लागतो. 2023 च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा अश्विनचा सामना करण्यासाठी कांगारुंनी खास तयारी केली होती. तरीही अश्विनविरोधात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी लोटांगण घातले होते.
नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाविरोधात अश्विन याने शानदार कामगिरी केली होती. इंदूर वनडेमध्ये 41 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या होत्या. अश्विनच्या भात्यात अनेक प्रकारचे चेंडू आहेत. तो वेगवेगळ्या फलंदाजासाठी वेगवेगळ्या चेंडूचा वापर करतो. त्याशिवाय अश्विन फलंदाजाचा अभ्यास करुन तशी गोलंदाजी करतो. भारतामधील फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर अश्विनचा गोलंदाजी इकॉनॉमी रेट 5 च्या आसपास आहे. अशा स्थितीत अश्विन आजच्या सामन्यात गेम चेंजर ठरेल.
आणखी वाचा :
IND vs AUS : रोहित-स्टार्क ते वॉर्नर-अश्विन, आजच्या सामन्यात या खेळाडूंमध्ये लढत, कुणाचा विजय होणार?
दक्षिण आफ्रिकेकडून कांगारुच्या विक्रमाला सुरुंग, 2015 चा मोठा विक्रम मोडला, भारतही यादीत