ODI World Cup 2023, Points Table : वनडे विश्वचषकाला दिमाखात सुरुवात झाली आहे. प्रत्येक संघाचा एक सामना झाला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यातील सामन्याने विश्वचषकाला सुरुवात झाली होती. रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात चेन्नई येथे सामना झाला. ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट आणि 52 चेंडू राखून पराभव केला. त्यानंततरही टीम इंडिया गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाना नेटरनरेट इतर संघाच्या तुलनेत खराब असल्यामुळे गुणतालिकेत खाली आहे. गतविजेता इंग्लंड संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे. इंग्लंडला सलामीच्या सामन्यात नऊ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता. गत उपविजेत्या न्यूझीलंडने इंग्लंडचा दारुण पराभव केला होता. 

विश्वचषकाचे आतापर्यंत 5 सामने झाले आहेत. दहा संघांचा प्रत्येकी एक एक सामना झाला आहे. पाच संघांचा विजय विजय झाला तर पाच जणांना पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला इतर चार संघाच्या तुलनेत कमी फरकाने विजय मिळवला, त्यामुळे पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळेच भारतीय संघ टॉप 4 मधून बाहेर आहे.

यंदाचा विश्वचषक राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे अद्याप 8-8 सामने बाकी आहे. गुणतालिकेत आघाडीचे चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. जसजसी स्पर्धा पुढे जाईल, तसतसा गुणतालिकेत चढ उतार पाहायला मिळणार आहे.  पाहूयात गुणतालिकेची सध्याची स्थिती काय...

संघ सामना विजय पराभव गुण नेट रन रेट
न्यूझीलंड 1 1 0 2 2.149
दक्षिण अफ्रीका 1 1 0 2 2.040
पाकिस्तान 1 1 0 2 1.620
बांगलादेश 1 1 0 2 1.438
भारत 1 1 0 2 0.883
ऑस्ट्रेलिया 1 0 1 0 -0.883
अफगानिस्तान 1 0 1 0 -1.438
नेदरलँड्स 1 0 1 0 -1.620
श्रीलंका 1 0 1 0 -2.040
इंग्लंड 1 0 1 0 -2.149

भारताची विजयी सुरुवात - 

रोहित शर्माच्या भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी पराभव करून, वन डे विश्वचषकात विजयी सलामी दिली. चेन्नईतल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 200 धावांचंच माफक आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था दोन षटकांत तीन बाद दोन धावा अशी केविलवाणी झाली होती. त्या परिस्थितीत विराट कोहली आणि लोकेश राहुलनं रचलेल्या 165 धावांच्या झुंजार भागिदारीनं भारताला विजय मिळवून दिला. विराटनं 116 चेंडूंत सहा चौकारांसह 85 धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलनं 115 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 97 धावांची खेळी केली. त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 199 धावांत गुंडाळला. भारताकडून रवींद्र जाडेजानं तीन, तर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. रवीचंद्रन आश्विन, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या या तिघांनीही प्रत्येकी एक विकेट काढली.