World Cup 2023 Points Table :  अफगाणिस्तानचा दारुण पराभव करत न्यूझीलंडने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. अफगाणिस्तानच्या पराभवामुळे भारतीय संघाचे अव्वल स्थान गेले आहे. पहिल्या क्रमांकावर असणारी टीम इंडिया आता दुसऱ्या स्थानी घसरली आहे. न्यूझीलंडने चार सामन्यात चार विजय मिळवत अव्वल स्थान काबिज केले आहे. भारतीय संघ तीन सामन्यातील सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आज भारताला पहिल्या क्रमांकावर पुन्हा झेप घेण्याची संधी आहे. पुण्यात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर विराजमान होण्याची टीम इंडियाकडे संधी आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांचे समान गुण आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचा रनरेट सरस असल्यामुळे चार गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. तर पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघाला तीन सामन्यात दोन विजय आणि एका पराभवाचा सामना करावा लागला. 


न्यूझीलंडच्या विजयामुळे गुणतालिकेत फेरबदल - 


न्यूझीलंडकडून 149 धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ नवव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. अफागणिस्तान संघाला चार सामन्यात एक विजय आणि तीन पराभव स्विकारावे लागले आहेत. गतविजेता इंग्लंड पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. तर बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाला तीन सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सातव्या स्थानावर आहे. 
 
श्रीलंका तळाला - 


बांगलादेशचा संघ तीन सामन्यात दोन गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दोन गुणांसह आठव्या तर नेदरलँडचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. विश्वचषक विजेत्या श्रीलंकेला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. तीन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेचा संघ शून्य गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.


आज भारताला नंबर एक होण्याची संधी -


पुण्यात आज भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढत होणार आहे. या लढतीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पुण्याच्या मैदानावर भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत करत भारताला गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज करण्याची संधी आहे. भारतीय संघाने विश्वचषकाच्या तीन सामन्यात तीन विजयासह दुसरे स्थान पटकावले आहे. आज बांगलादेशी टायगरचा परभाव करत पुन्हा अव्वल स्थान काबिज करण्याची टीम इंडियाकडे संधी असेल. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा पुण्याच्या मैदानावर चांगला रेकॉर्ड आहे.