Afghanistan Semi Final Chances : भारतात सुरु असेलल्या विश्वचषकात अफगाणिस्तान संघाने शानदार प्रदर्शन केलेय. अफगाणिस्तान संघाने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या तगड्या संघाचा पराभव केलाय. 2019 च्या विश्वचषकात सर्व सामने गमावणाऱ्या अफगाणिस्तान संघाने यंदाच्या विश्वचषकात अफलातून कामगिरी केली आहे. अफगाणिस्तान संघाने तीन विश्वचषक विजेत्या संघाचा पराभव करत उलटफेर केलाय. सहा सामन्यात तीन विजयासह अफगाणिस्तान संघाने सेमीफायनलच्या दिशेन पावले टाकली आहेत. अफगाणिस्तानच्या शानदार कामगिरीनंतर प्रत्येकाला 2003 विश्वचषकाची आठवण झाली आहे. 2003 च्या विश्वचषकातही केनिया या कमकुवत संघाने सर्वांना मागे टाकून उपांत्य फेरी गाठली होती. 2003 च्या विश्वचषकात केनियाने सर्वांना आश्चर्यचकित केले. आता अफगाणिस्तानने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केलेय. त्यामुळे केनियाप्रमाणे अफगाणिस्तानही बलाढ्य संघांना मागे टाकून उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल का, असा प्रश्न उपस्थित झालाय. त्याबाबत चर्चाही सुरु झाली आहे.
केनियाच्या संघाने 2003 च्या विश्वचषकात न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यासारख्या बलाढ्य संघाना मागे टाकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि भारतासह केनियाने 2003 मध्ये सेमीफायनल गाठली होती. यंदाच्या विश्वचषकातही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता आहे. भारताचे आणि दक्षिण आफ्रिकेचे स्थान जवळपास निश्चित झालेय. त्यांना आणखी एका विजयाची गरज आहे. पण चौथा संघ कोण असेल याबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. सेमीफायनलच्या चौथ्या जागेसाठी अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघामध्ये स्पर्धा आहे. त्याशिवाय नेदरलँड्स संघाचाही समावेश होऊ शकतो. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नसेल.
अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये कसा जाणार? समीकरण काय ?
अफगाणिस्तान संघाने विश्वचषकातील सहा सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान या बलाढ्य संघाचा त्यांनी पराभव केलाय. 6 गुणांसह अफगाणिस्तान गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. साखळी फेरीत अफगाणिस्तानचे अद्याप तीन सामने शिल्लक आहेत. सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी अफगाणिस्तानला उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरोधात अफगाणिस्तानला भिडायचे आहे. अफगाणिस्तान संघाने या तिन्हीही सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे 12 गुण होतील. ऑस्ट्रेलियाही 12 गुणांवरच राहणार आहे. अशा स्थितीत नेटररनेट महत्वाचा ठरणार आहे. ज्या संघाचा रनरेट चांगला तो संघ सेमीफायनलमध्ये जाईल.
जर अफगाणिस्तानने दोन सामने मोठ्या फरकाने जिंकले. ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडने आपले उर्वरित दोन सामने गमावले. तर अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. दुसरीकडे, अफगाणिस्तान संघाला आपले उर्वरित दोन सामने जिंकता आले, तर त्यांना श्रीलंका आणि पाकिस्तानच्या पराभवाची आशा धरावी लागेल, तरच त्यांना उपांत्य फेरीत प्रेवश मिळण्याची शक्यता आहे.
सेमीफायनलसाठी काय करावे लागेल ?
अफगाणिस्तानचे सेमीफायनलमध्ये पोहचण्याची 32 टक्के शक्यता आहे. पण त्यांच्यासाठी आव्हान खडतर आहे. त्यांना पुढील तिन्ही सामन्यात विजय मिळवायचा आहे. यामध्ये नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघाचा समावेश आहे. नेदरलँड्सविरोधात विजय मिळवला तरी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या संघाला हरवणं थोडे कठीण आहे. पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. त्यामुळे अफगाणिस्तानच्या पुढील सामन्यांकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.