IND vs AUS Stats & Facts : चेन्नईमध्ये सुरु असलेल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 199 धावात रोखले. या सामन्यात जसप्रीत बुमराहने भेदक मारा केला. बुमराहने 10 षटकात 35 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया या सामन्यात अनेक विक्रम झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 150 वा वनडे सामना आहे. त्याशिवाय डेविड वॉर्नरने विश्वचषकात सर्वात वेगवान एक हजार धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीने विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक झेल घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांच्या नावावरही विकर्म झाला आहे.  मिचेल मार्श याला शून्यावर बाद करत जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम नावावर केला आहे. पाहूयात, रोहित आणि बुमराहच्या नावावर कोणते विक्रम झाले आहेत. 


रोहित शर्माच्या नावावर कोणता विक्रम ?


विश्वचषकात मैदानात उतरताच रोहित शर्माच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे. विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा सर्वात वयोवृद्ध कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर विक्रम झाला आहे. रोहित शर्माने माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन याचा रेकॉर्ड मोडला आहे. 1999 विश्वचषकात मोहम्मद अजहरुद्दीन टीम इंडियाचा कर्णधार होता, तेव्हा त्याचे वय 36 वर्ष 124 दिवस होते. आज हाच विक्रम मोडीत निघाला आहे. 


जसप्रीत बुमराहच्या नावावर विक्रम - 


मिचेल मार्श याला शून्यावर बाद करत जसप्रीत बुमराह याने विक्रम नावावर केला आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजाला शून्यावर बाद करणारा जसप्रीत बुमराह पहिल्या भारतीय गोलंदाज ठरला आहे. 


विराट कोहलीच्या नावावरही विक्रम - 


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसल्याचे तिसऱ्याच षटकात स्पष्ट झाले. जसप्रीत बुमराह याने मिचेल मार्श याला शून्यावर तंबूत पाठवले. मिचेल मार्शच्या बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू विराट कोहलीने पकडला. विराट कोहलीने अप्रतिम झेल घेत मार्शचा डाव संपवला. विराट कोहलीचा हा विश्वचषकातील 15 वा झेल ठरला. यासह विराट कोहलीने विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू म्हणून मान मिळवला. 


विराट कोहलीने विश्वचषकाच्या 27 डावामध्ये 15 झेल घेतले आहेत. 2011 ते 2023 यादरम्यान विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक आहे. या विश्वचषकातील 27 सामन्यात विराट कोहलीने 15 झेल घेतले आहेत. अनिल कुंबळे याने 18 सामन्यात 14 झेल घेतले आहेत. सचिन तेंडुलकर याला 44 सामन्यात फक्त 12 झेल घेता आलेत.