India Women vs Pakistan Women Women's Asia Cup T20 2022: महिला आशिया चषकातील  तेराव्या सामन्यात भारतीय महिला संघाला पाकिस्तानकडून 13 धावांनी (IND vs PAK) पराभव स्वीकारावा लागलाय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघानं भारतासमोर 20 षटकांत 138 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघ 19.4 षटकांत 124 धावांवर ऑलआऊट झाला. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या संघानं आशिया चषकात प्रथमच भारताविरुद्ध सामना जिंकलाय. यापूर्वी खेळले गेलेल्या सर्व सामन्यात पाकिस्तानच्या पदरात निराशा पडलीय. 


पाकिस्तानची भारताविरुद्ध कामगिरी
महिला आशिया चषकाच्या ऐतिहासात भारत आणि पाकिस्तान 12 वेळा आमने-सामने आले आहेत. यातील भारतानं 11 सामने जिंकले आहेत. तर, पाकिस्तानं आज पहिल्या विजयाची नोंद केली आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानची भारतविरुद्धची कामगिरी अतिशय खराब आहे. परंतु, कर्णधार बिस्माह मारूफच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघानं भारताविरुद्ध पहिल्या विजयाची नोंद केलीय.


भारताचा 13 धावांनी पराभव
या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निदा दारच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्ताननं 20 षटकात 6 विकेट्स गमावून भारतासमोर 138 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक तीन विकेट्स तर, पूजा वस्त्राकरनं दोन विकेट्स घेतल्या. पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची तारांबळ उडाली. भारताकडून ऋषा घोषनं सर्वाधिक 26 धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक्त भारताच्या एकही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. परिणामी, भारताचा संघ 19.4 षटकांत 124 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून नसरा संधूनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर,सादीया इक्बाल आणि निदा दार यांना प्रत्येकी दोन दोन-दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, अनवर आणि तुबा हसन यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स पडली. हा सामना पाकिस्ताननं 13 धावांनी जिंकला. 


आशिया चषक 2022 मधील भारताचा पहिला पराभव
आशिया चषक 2022 स्पर्धेत भारतानं गट सामन्यात सलग तीन सामने जिंकले होते. विजयरथावर स्वार झालेल्या भारतीय संघाला पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेतील सलग चौथा विजय नोंदवून उपांत्य फेरीत स्थान पक्कं करायचं होतं. पण पाकिस्तानच्या संघानं भारताच्या आशावर पाणी फेरलं. 



हे देखील वाचा-