IND vs ENG Player of The Series Award : भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेली 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारताच्या कर्णधार शुभमन गिलला भारताकडून प्लेयअर ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला, तर इंग्लंडकडून हा सन्मान हॅरी ब्रूक याला देण्यात आला. पण तुम्हाला माहिती आहे का की, प्लेयर ऑफ द सिरीज कोण निवडतो? आणि यासाठी काय नियम असतो? चला तर मग जाणून घेऊया.

प्लेयर ऑफ द सिरीज निवडीचे नियम काय आहेत?

अलिकडच्या काही वर्षांपासून इंग्लंडमध्ये असे ठरवले गेले आहे की कसोटी मालिका कोणतीही असो, ती मालिका कोण जिंकेल यावर अवलंबून न ठेवता, दोन्ही संघांतील प्रत्येकी एका खेळाडूला 'प्लेयअर ऑफ द सिरीज' दिला जाईल. या निवडीची जबाबदारी दोन्ही संघांचे मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. उदाहरणार्थ, इंग्लंडचे कोच ब्रेंडन मॅक्युलम यांनी शुभमन गिलला हा सन्मान दिला. तर भारतीय कोच गौतम गंभीर यांनी हॅरी ब्रूकला प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून निवडले. 

गौतम गंभीरकडून इंग्लंडच्या 'त्या' दोन खेळाडूंचा गेम 

यावरून सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. मालिकेत हॅरी ब्रूकने चांगली खेळी केली असली, तरी जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत इंग्लंडसाठी महत्वाची भूमिका बजावली. जो रूटने संपूर्ण मालिकेत सर्वाधिक धावा केल्या, तर बेन स्टोक्सने संकटाच्या क्षणी दमदार योगदान दिलं. तरीही गंभीरने थेट हॅरी ब्रूकला इंग्लंडकडून प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून जाहीर केलं. यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त करत गंभीरवर पक्षपात केल्याचे आरोप केले आहेत. काहींनी तर थेट लिहिलं की, गंभीरने रूट आणि स्टोक्सचा गेम केला. तर काहींचं म्हणणं आहे की, भारतासाठी मोहम्मद सिराजने 5 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या, त्यामुळे त्यालाच हा मान मिळायला हवा होता.

शुभमन गिल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज...

भारतीय कर्णधार शुभमन गिल इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गिलने 5 सामन्यांच्या 10 डावात 75.40 च्या सरासरीने 754 धावा केल्या. यादरम्यान त्याने एका द्विशतकासह 4 शतके केली.

मालिकेत हॅरी ब्रुकची कामगिरी कशी होती?

भारत आणि इंग्लंडदरम्यान खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत हॅरी ब्रुकची कामगिरी उत्कृष्ट होती. मालिकेच्या पहिल्या सामन्यात हॅरी ब्रुक 99 धावांची खेळी खेळून बाद झाला आणि शतक हुकले. त्याच वेळी, दुसऱ्या डावात त्याने शून्यावर आपली विकेट गमावली. पण, नंतर बर्मिंगहॅममधील दुसऱ्या कसोटी सामन्यात या खेळाडूने 158 धावांची शतकी खेळी केली.

दुसऱ्या डावात 23 धावा केल्या. लॉर्ड्समध्ये ब्रुकची बॅट शांत होती, त्याने 11 आणि 23 धावा केल्या आणि मँचेस्टरमध्येही तो फक्त 3 धावा करू शकला. पण, शेवटच्या कसोटीत त्याने पुन्हा आपला फॉर्म दाखवला. पहिल्या डावात त्याने 53 आणि दुसऱ्या डावात 111 धावा केल्या. ब्रुकने 5 सामन्यांच्या 9 डावात 53.44 च्या सरासरीने 481 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 शतके निघाली.