West Indies 27 all out vs Australia : जमैका येथील सबीना पार्क मैदानावर खेळलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिज संघाची अक्षरशः धुलाई केली. यजमान कॅरेबियन संघ केवळ 27 धावांत दुसऱ्या डावात गारद झाला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-0 ने वेस्ट इंडिजचा पराभव केला. या लज्जास्पद पराभवामुळे क्रिकेट वेस्ट इंडिज (CWI) बोर्ड हादरले असून त्यांनी तात्काळ आपले माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लारा आणि सर विवियन रिचर्ड्स यांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
बोर्डाचे अध्यक्ष किशोर शालो यांनी या बैठकीद्वारे सध्याच्या संघाला दिग्गजांद्वारे मार्गदर्शन मिळावे, असा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, ही हार प्रत्येक वेस्ट इंडिज क्रिकेटप्रेमीला चटका लावणारी आहे.
शालो यांनी आपल्या निवेदनात म्हटलं, “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचं दु:ख आम्हा सर्वांना झालं आहे. हे दुःख केवळ चाहतेच नव्हे तर खेळाडूंच्या मनालाही सल देणारं आहे. अशा रात्री झोप येणे कठीण आहे. पण हा क्षण आपल्या प्रवासाचा शेवट नाही, तर एक नवी सुरुवात ठरवायचा आहे. आपल्याला नव्या पिढीचे घडवणं गरजेचं आहे.”
या पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट केलं की, “वेस्ट इंडिज क्रिकेटचं पूर्वीचं वैभव पुन्हा मिळवायचं असेल तर ब्रायन लारा आणि विव रिचर्ड्स यांसारख्या महान खेळाडूंचा दृष्टिकोन आणि मार्गदर्शन अत्यंत मोलाचं ठरेल. ही बैठक केवळ औपचारिक न राहता, त्यातून ठोस उपाययोजना समोर याव्यात, हीच आमची अपेक्षा आहे. अजून खूप काम बाकी आहे.”
दरम्यान, ही पराभव मालिका इतकी धक्कादायक होती की तीनही कसोटी सामने फक्त तीन दिवसांतच संपले. विशेष म्हणजे शेवटच्या कसोटीत वेस्ट इंडिजचा दुसरा डाव अवघ्या 14.3 षटकांत 27 धावांवर आटोपला, जो टेस्ट क्रिकेटमधील दुसरा सर्वात कमी स्कोअर आहे. 1955 साली न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध 26 धावा केल्या होत्या, तेव्हापासूनचा हा विक्रम आजही कायम आहे.
वेस्ट इंडिजसारख्या एकेकाळच्या बलाढ्य संघाची अशी अवस्था क्रिकेट विश्वासाठीही धक्कादायक आहे. आता पाहावे लागेल की लारा-रिचर्ड्स यांचे मार्गदर्शन आणि बोर्डाचे नवे प्रयत्न संघाला पुन्हा गौरवशिखराकडे नेऊ शकतात का?
हे ही वाचा -