VIDEO | अर्जुन तेंडुलकरचा लक्ष्यभेद, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2019 02:21 PM (IST)
एमसीसी यंग क्रिकेटर्स संघाकडून खेळताना अर्जुनने 11 षटकात 50 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या.
लंडन : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 19 वर्षीय अर्जुन सध्या इंग्लंडमधल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत एमसीसी यंग क्रिकेटर्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. या संघाकडून खेळताना अर्जुनने एका सामन्यात सरे सेकंड इलेव्हन संघाच्या नॅथन टायलीचा त्रिफळा उडवला. योग्य लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना अर्जुनने आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी केली. त्याच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नॅथन टायलीने बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अपयशी ठरला. डावखुऱ्या अर्जुनच्या गोलंदाजीवर नॅथन पूर्णपणे चकला आणि चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला. इंग्लंडमधल्या लॉर्डस क्रिकेट ग्राऊंडच्या अधिकृत ट्विटरवरुन अर्जुनचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आणि त्यानंतर नेटिझन्सनी अर्जुनच्या कामगिरीचं तोंडभरुन कौतुकही केलं. दरम्यान एमसीसी यंग क्रिकेटर्स संघाकडून खेळताना अर्जुनने 11 षटकात 50 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. यामध्ये दोन मेडन षटकांचाही समावेश आहे. मात्र नो बॉलवर चार अतिरिक्त धावाही दिल्या. अर्जुन तेंडुलकरचा भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघात समावेश झाला होता. जुलै 2018 मध्ये पहिल्या यूथ कसोटी सामन्यात श्रीलंका अंडर -19 संघाविरोधात कोलंबो क्रिकेट क्लब मैदानावर पहिली विकेट घेतली.