एजबॅस्टन : केन विल्यम्सनने कर्णधारास साजेसं शतक झळकावून न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेवर सनसनाटी विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने हा सामना चार विकेट्सनी जिंकला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 49 षटकांत 242 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान तीन चेंडू आणि चार विकेट्स राखून पार केलं.

पावसामुळे सामना उशिरा सुरु झाल्याने प्रत्येक डावात 49 षटकं खेळवण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या डावात रासी वॅन डेर ड्युसेनने नाबाद 67 धावांची बहुमोल खेळी उभारली. एडन मारक्रमने 36 आणि डेव्हिड मिलरने 36 धावांची खेळी केली. ड्युसेन आणि मिलरने पाचव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचली. यामुळे दक्षिण आफ्रिकेने 49 षटकात सहा विकेट्सच्या मोबदल्यात 241 धावा केल्या.

यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेच्या वाईट क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतला. विल्यम्सन आणि ग्रॅण्डहोम जोडीने न्यूझीलंडने हे लक्ष्य सहा विकेट्स गमावून 48.3 षटकात पार केलं. लुंगी नगिदीने 48 व्या षटकात कॉलीन डी ग्रॅण्डहोमला बाद करत सामन्यात रोमांचक ट्विस्ट आणला. पण अखेरच्या षटकात विल्यम्सनने षटाकार ठोकून शतक पूर्ण केलं आणि धावसंख्या बरोबरीत आणली. त्यानंतर विजयी चौकार लगावला.

केन विल्यम्सनने चेंडूत चौकारांसह नाबाद 103 धावांची खेळी साकारली. त्याने पाचव्या विकेटसाठी कॉलीन डी ग्रॅण्डहोमसह 91 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. तर ग्रॅण्डहोमने 47 चेंडूत 60 धावांचं योगदान दिलं.