Dean Elgar on Virat Kohli :  दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गर याने नुकताच कसोटीला रामराम (Dean Elgar retirement) ठोकला होता. भारताविरोधात (IND vs SA) त्याने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. निवृत्तीच्या एक महिन्यानंतर डीन एल्गर याने खळबळजनक दावा केला आहे. 2015 मधील भारत दौऱ्यातील एक प्रसंग एल्गर याने सांगितलाय. एल्गर याने असा दावा केलाय की मोहाली कसोटी सामन्यात विराट कोहली (Virat Kohli)  त्याच्यावर थुंकला होता. एल्गरच्या या वादग्रस्त दाव्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. विराट कोहली चाहत्यांनी एल्गरचा समाचार घेतलाय. 


विराटला बॅटने मारण्याची  धमकी – 


2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चार कसोटी सामन्याची मालिका पार पडली होती. मोहाली कसोटी सामन्यात भारताने 108 धावांनी विजय मिळवला होता. भारताने ही कसोटी मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली. या मालिकेदरम्यान मोहाली कसोटीमध्ये विराट कोहली अंगावर थुंकल्याचा दावा एल्गर याने केला आहे. त्यावेळी विराट कोहलीची कर्णधार म्हणून मायदेशातील पहिलीच कसोटी मालिका होता. पुन्हा असे केले तर बॅटने मारेल, असेही विराट कोहलीला धमकावल्याचे एल्गर याने दावा केलाय. 


जाडेजा - कोहली माझ्यावर थुंकले - 


डीन एल्गर याने यूट्यूब चॅनलवर एक मुलाखत दिली. त्यामध्ये कोहली अन् जाडेजा यांच्यावर गंभीर आरोप केले. तो म्हणाला की, " मोहाली कसोटी सामन्यात खेळपट्टीवरुन विनोद केले जात होते. अश्विनचा सामना करताना मला संयम आणि लय कायम ठेवायची होती. त्यावेळी जाडेजा आणि कोहली माझ्यावर थुंकले होते. त्यावेळी मी त्यांना पुन्हा असं केले तर बॅटने मारेल, असं ठणकावलं होतं. " कोहलीला तुझी भाषा समजली का? असे एल्गर याला विचारण्यात आले. त्यावर एल्गर म्हणाला की, विराट कोहलीला मी काय म्हणालो हे समजले होते. कारण एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळत होता.



कोहलीने मागितली माफी - 
 
 2017-18 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. त्यावेळी ड्रिंक्सवेळी माफी मागितली होती.  आफ्रिकेचा माजी सलामी फलंदाज डीन एल्गर म्हणाला की, मोहाली कसोटीतील घटनेनंतर तीन वर्षानंतर विराट कोहलीने मला ड्रिंक्ससाठी आमंत्रित केले होते. कसोटी मालिकेनंतर ड्रिंक्ससंदर्भात त्याने विचारले होते. मला तुझी माफी मागायची आहे, असे विराट म्हणाला होता. त्यावेळी आम्ही पहाटे तीन वाजेपर्यंत ड्रिंक्स केली होती. विराट कोहली त्यावेळी ड्रिंक करत होता. 





 
डीन एल्गरचं करिअर - 


डीन एल्गर याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराने आतापर्यंत 86 कसोटी आणि 8 वनडे सामने खेळले आहेत. 2012 ते 2024 यादरम्यान डीन एल्गर याने 152 डावांमध्ये 5347 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतके आणि 23 अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने कसोटीमध्ये 648 चौकार आणि 26 षटकार ठोकले आहेत. एल्गर याला वनडेमध्ये साजेशी कामगिरी करता आली नाही. फक्त आठ वनडे सामन्यात तो खेळला आहे. त्यामधील सात डावात त्याने 104 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 42 इतकी आहे.