Virat Kohli Savagely Trolls Arshdeep Singh : टीम इंडियाने विशाखापत्तनममध्ये झालेला निर्णायक वनडे सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका आपल्या नावावर केली. अखेरच्या सामन्यात भारताने 9 विकेटने सहज विजय मिळवला आणि मालिका 2-1 ने जिंकली. सामन्याचा हिरो यशस्वी जैसवाल, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा ठरला, तर मालिकेचा सुपरस्टार विराट कोहली राहिला. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या विराटने अखेरच्या सामन्यातही तुफानी खेळी खेळली. पण बॅटिंगसोबतच कोहलीने आपल्या भन्नाट ट्रोलिंगमुळेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्याचा 'शिकार' अर्शदीप सिंग झाला.
विजयाच्या पाठलागात कोहलीची तडाखेबाज खेळी
टीम इंडियाला विजयासाठी 271 धावांचे लक्ष्य मिळाले होते. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा याने 155 धावांची दमदार सलामी भागीदारी करत अर्ध्यापेक्षा जास्त काम उरकले. त्यानंतर उरलेल्या धावा कोहलीने वेळ न दवडता सहज पूर्ण केल्या. त्याने नाबाद 65 धावा ठोकत भारताला मालिका विजय मिळवून दिला. मागील दोन सामन्यात सलग शतके झळकावलेल्या विराटकडून या सामन्यातही शतकाची अपेक्षा होती, पण लक्ष्य लहान असल्याने त्याला ते साधता आले नाही.
अर्शदीपच्या प्रश्नावर विराटचा भन्नाट रिप्लाय...
शतकाची हॅट्रिक न जमल्यामुळे प्रेक्षक थोडे निराश झाले असतील. पण अर्शदीप सिंग याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकल्यानंतर विराट कोहलीसोबत एक मजेशीर रील बनवली. या रीलमध्ये विराटने अर्शदीपला भन्नाट स्टाईलमध्ये ट्रोल केलेलं पाहायला मिळालं. सामन्यानंतर अर्शदीप आपल्या मोबाइलवर रील शूट करू लागला आणि मजेत कोहलीला म्हणाला, “पाजी, रन कम रह गए, सेंच्युरी आज पक्की थी वैसे.” यावर विराटने जे उत्तर दिलं, ते ऐकून अर्शदीपच नाही तर कोणीही फुटून हसू लागला. कोहली म्हणाला की, “टॉस जीत गए, नहीं तो तेरी भी पक्की थी सेंच्युरी में.”
विराटने असा टोमणा का मारला?
खरं म्हणजे, मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारत नाणेफेक हरला होता आणि दुसऱ्या डावात बॉलिंग करावी लागली होती. संध्याकाळी वाढलेल्या ओसामुळे भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली होती. मात्र तिसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ओसचा त्रास टळला. विराटने हाच मुद्दा मजेशीर पद्धतीने अर्शदीपला आठवण करून दिला आणि त्याच एका ओळीने संपूर्ण माहोल रंगून गेला.
हे ही वाचा :