Gautam Gambhir on IPL Delhi Capitals Owner Parth Jindal : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडिया आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीकेची झोड उठली. गंभीरला कसोटी संघाच्या कोचिंगमधून हटवण्याची मागणी सातत्याने होत आहे. अनेक जण त्याच्यावर विविध प्रकारची वक्तव्ये करत आहेत आणि सोशल मीडियावरही त्याच्यावर टीका होत आहे. मात्र आता या टीकेचा गंभीरवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे वनडे मालिकेत भारताच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर गंभीर याने एका आयपीएल फ्रँचायझीच्या मालकावरच राग काढला.
वनडे विजय, पण गंभीर संतापला
घरच्या मैदानावर 0-2 ने कसोटी मालिका गमावल्यावर भारताने वनडे मालिकेत प्रतिष्ठा वाचवली. विशाखापट्टणम येथे 6 डिसेंबरला झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने द. आफ्रिकेला 9 विकेट्सने पराभूत करत मालिका 2-1 ने जिंकली. सामन्यानंतर गंभीर पत्रकार परिषद घेण्यासाठी आला. तेव्हा कसोटी मालिकेतील पराभवानंतर होत असलेल्या टीकेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्याचा राग अनावर झाला.
‘लोकांनी आपापल्या मर्यादेत राहावे...’ – गौतम गंभीर
गंभीर म्हणाला, “लोक आणि मीडिया हे विसरतात की पहिल्या कसोटीमध्ये आमचा कर्णधार आणि आमचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज दोन्ही डावांत मैदानात उतरू शकला नाही. लोकांनी अशीही वक्तव्ये केली ज्यांचा क्रिकेटशी काहीही संबंध नाही. एका आयपीएल टीमच्या मालकाने तर स्प्लिट कोचिंगबद्दल भाष्य केले. लोकांनी स्वतःच काम बघितलं पाहिजे. आम्ही त्यांच्या कामात बोलत नाही, तर त्यांनीही आमच्या कामात नाक खुपसू नये.”
दिल्ली कॅपिटल्सच्या मालकावरच निशाणा?
गौतम गंभीरच्या या वक्तव्याचा स्पष्ट निशाणा दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदल यांच्यावर होता. कसोटी मालिकेतील पराभवानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीम इंडियासाठी स्प्लिट कोचिंगची मागणी केली होती. कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक असावेत, असे त्यांनी म्हटले होते.
स्प्लिट कोचिंगची मागणी भारतीय क्रिकेटमध्ये नवीन नाही. रवि शास्त्री आणि राहुल द्रविडच्या कार्यकाळातही यावर चर्चा होत राहिली होती. मात्र त्या दोघांनी कधीही सार्वजनिकपणे अशी प्रतिक्रिया दिली नव्हती. पण गंभीरच्या वक्तव्याने त्याच्या स्वभावाबद्दल आणि टीकेला दिलेल्या उत्तराबद्दल नवे प्रश्न उपस्थित केले आहेत. टीमने मालिका जिंकूनही गंभीरवर टीकेची लाट कायम आहे.
हे ही वाचा -