Virat Kohli-Naveen Ul Haq Controversy: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023 च्या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत काय राहिलं असेल तर ती म्हणजे, भर सामन्यात विराट कोहली (Virat Kohli), गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि नवीन उल हक (Naveen-ul-Haq) यांच्यात झालेला वाद. या तिघांच्या वादाची चर्चा संपूर्ण आयपीएलभर आणि आयपीएल संपल्यानंतरही गाजली. कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि नवीन लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळत होता. तर गंभीर हा लखनौचा मेंटॉर होता. पण आता या तिघांच्या वादात एका पाकिस्तानी खेळाडूची एन्ट्री झाली आहे. 


विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक या तिघांच्या वादात पकिस्तानी ओपनर इमाम उल हकनं एन्ट्री घेतली. त्यानं दावा केलेला की, या वादात पाकिस्तानी प्लेयर आगा सलमाननं इंस्टाग्रामवर मेसेज पाठवून विराट कोहलीला "छोटा बच्चा" असं संबोधलं होतं. त्यावेळी इमामच्या वक्तव्यानंतर सलमानवर जोरदार टीका झाली आहे. विराट फॅन्सनी सलमानला पळता भुई थोडी करुन ठेवली होती. 


खुद्द आगा सलमाननं याप्रकरणी खुलासा केलाय 


यासर्व वादावर आता स्वतः आगा सलमाननं आपलं मौन सोडलं आहे. सलमाननं स्वतः पुढे येऊन या प्रकरणाचा खुलासा केला आहे. त्या वक्तव्यात इमामनं खूप खोटं बोलल्याचं सांगितलं. सलमाननं सांगितलं की, त्यानं कोहलीला कधीही "छोटा बच्चा" असं संबोधलं नव्हतं. पाकिस्तान सुपर लीग (PSL) दरम्यान त्यानं हा खुलासा केला.


सलमान पीएसएलमध्ये इस्लामाबाद युनायटेडकडून खेळतो. त्याच्या फ्रँचायझीसोबतच्या व्हिडीओ संभाषणादरम्यान तो म्हणाला, "मैदानावरचा तो खूपच हीटेड क्षण होता, पण नंतर जर तो गमतीशीर पद्धतीनं निघून गेला, तर ती वेगळी गोष्ट आहे. पण मैदानावर काय चाललंय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. त्या घटनेनंतर मी विराट कोहलीला मेसेज केला आणि त्या मेसेजची सुरुवात विराट भाई अशी केली होती. कारण मी त्याचा खूप आदर करतो आणि मी त्याला "छोटा बच्चा" वैगरे असं काहीही म्हटलेलं नाही.


कोहली गमतीनं म्हणाला होता, "मी स्क्रीनशॉट शेअर करेन"


आपलं मत व्यक्त करताना आगा सलमान म्हणाला की, "मी चुकून शादाब खानला कोहलीला मेसेज करण्याबाबत सांगितलं होतं. आशिया कप 2023 दरम्यान शादाबनं पुन्हा कोहलीला सांगितलं की, त्यावेळी सलमाननं त्याला एक मेसेज केला होता. यावर कोहली म्हणाला की, त्यावेळी खूप मेसेज येत होते, त्यामुळे कदाचित मी तो मेसेज पाहू शकलो नाही. पण हो, मी आता त्याचा स्क्रीनशॉट टाकणार आहे. विराटनं हे सांगताच सगळे हसू लागले."


कोहली आणि नवीनमधील वादाचा अंत कसा झाला? 


आयपीएलमधील इतिहासातील सर्वात मोठा वाद कोणता? तर विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यातील वाद सर्वांच्या डोळ्यांसमोर येतो. गजबजलेल्या मैदानात भर सामन्या दरम्यान हा वाद झाला होता. 1 मे 2023 रोजी झालेल्या आयपीएल सामन्यात बंगळुरूनं लखनौचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान कोहली आणि नवीन यांच्यात वाद झाला होता. या वादानं स्टेडियमचं टेम्परेचर खूपच वाढलं होतं. यानंतर सामना संपल्यावर कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात तू-तू, मैं-मैं झाली होती. तेव्हा या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. पण कोहली आणि नवीन यांच्यातील हा वाद 2023 च्या विश्वचषकादरम्यान संपला.  


वर्ल्डकप दरम्यान टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळला गेला होता. कोहली आणि नवीन दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. या घटनेनंतर कोहली आणि नवीन यांच्याबाबत सोशल मीडियावर होणारी ट्रोलिंग थांबली.