Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्समध्ये खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला एक अनोखा विक्रम नोंदवण्याची सुवर्णसंधी आहे. जर कोहलीने या सामन्यात 63 धावा केल्या तर त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23000 धावा पूर्ण होतील. आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात फक्त 6 फलंदाज आहेत ज्यांनी सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 23000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे.
कर्णधार कोहलीने आतापर्यंत क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 438 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 22937 धावा केल्या आहेत. तो 23000 धावांचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे. पुढील सामन्यात तो हा विक्रम आपल्या नावे करेल अशी अपेक्षा आहे. जर त्याने पुढील सामन्यात 63 धावा केल्या तर तो 23000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा जगातील 7 वा फलंदाज बनेल. याशिवाय, असे करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरेल. आतापर्यंत सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी भारतासाठी हा विक्रम केला आहे.
सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर अव्वल आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत एकूण 664 सामने खेळले, ज्यात त्याने 34357 धावा केल्या. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके झळकावण्याचा पराक्रमही केला आहे. सर्वाधिक धावांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगकारा आहे. संगकाराने 28016 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 27483 धावांसह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा महेला जयवर्धने आहे, त्याने 25957 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस 25534 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर राहुल द्रविड 24208 धावांसह या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. सध्या विराट कोहली सातव्या स्थानावर आहे.
विराट कोहली सध्या खराब फॉर्ममध्ये
विराट कोहली बऱ्याच काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये नाही आणि याच कारणामुळे नोव्हेंबर 2019 नंतर त्याच्या बॅटमधून एकही शतक आले नाही. टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर असली तरी विराट कोहलीचा फॉर्म नसणे ही चिंतेची बाब आहे. मात्र, विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी सोमवारी आशा व्यक्त केली होती की कोहली लवकरच शतक ठोकेल.