Virat Kohli-Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. विराट कोहलीने याबाबत बीसीसीआयला देखील कळवले आहे. 20 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मोठ्या मालिकेपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ इच्छित आहे. मात्र बीसीसीआयने विराट कोहलीला निवृत्तीबाबत पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले आहे. 

विराट कोहली अजूनही चांगला तंदुरुस्त आहे, त्याला अजूनही धावा करण्याची भूक आहे. ड्रेसिंग रूममध्ये त्याची उपस्थिती संपूर्ण संघाला ऊर्जा देते. त्यामुळे बीसीसीआयने विराट कोहलीला निवृत्तीबाबत फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे. बीसीसीआयच्या या विनंतीनंतर विराट कोहली कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

गौतम गंभीरला हवाय युवा कर्णधार-

डब्ल्यूटीसीची स्पर्धा पुन्हा नव्याने सुरु होणार आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही अशा खेळाडूंचा एक गट हवा आहे ज्यांच्यासोबत ते दीर्घकाळ काम करू शकतील. इतक्या महत्त्वाच्या मालिकेसाठी त्वरित कोणताही उपाय असू शकत नाही. गेल्या दोन मालिका भारतीय संघासाठी चांगल्या नव्हत्या, त्यामुळे इंग्लंडविरुद्धची मालिका खूप महत्त्वाची आहे. तसेच गौतम गंभीरला देखील युवा कर्णधार कसोटी क्रिकेटसाठी हवा आहे, अशी माहितीही समोर आली आहे. दरम्यान, भारतीय कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदासाठी शुभमन गिलचं नाव आघाडीवर आहे. 

विराट कोहलीची कसोटी कारकीर्द-

विराट कोहलीने जून 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध पहिला सामना खेळला होता. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 123 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 210 डावांमध्ये विराट कोहलीने 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा एक यशस्वी कर्णधार होता आणि त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपलनंतर कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतके करणारा विराट कोहली एकमेव दुसरा क्रिकेटपटू आहे. 

रोहित शर्माचीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती-

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये त्याचा अलिकडचा फॉर्म चांगला राहिलेला नाही. कसोटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी रोहित एकदिवसीय क्रिकेट खेळत राहील. 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.

राज्यातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Virat Kohli मोठी बातमी: रोहित शर्मानंतर विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार; बीसीसीआयला निर्णय कळवला