Virat Kohli England vs India Birmingham : ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्या फटकेबाजीनंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने भेदक मारा केला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ 61.1 षटकांत 284 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने दमदार शतकी खेळी केली. पहिल्या डावात भारताने 132 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना माजी कर्णधार विराट कोहलीने नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीने दोन संघाविरोधात 50-50 पेक्षा जास्त झेल घेण्याचा विक्रम केलाय. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय.
माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जॉनी बेयरस्टोचा शानदार झेल घेतला. त्यासह त्याने इंग्लंडविरोधात 50 झेल घेण्याचा विक्रम केला. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरोधात 55 झेल घेतले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशाविरोधात विराट कोहलीने 50 -50 झेल घेण्याचा पराक्रम केलाय. कोणत्याही दोन देशाविरोधात 50-50 झेल घेण्याचा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. हा पराक्रम आतापर्यंत कुणालाही करता आलेला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने कसोटीमध्ये 210 झेल घेतले आहेत.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताने ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकी खेळीच्या बळावर 416 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर गोलंदाजीत कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा केला. इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. 90 धावांच्या आत इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर जॉनी बेअरस्टो, कर्णधार बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्स यांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडचा संघ 280च्या पुढे पोहचला. जॉनी बेअरस्टोनं दमदार शतकी खेळी केली. त्याने 140 चेंडूत 106 धावांची खेळी केली. त्याशिवाय, जो रुट 31, बेन स्टोक्स 25, सॅम बिलिंग्स 36 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमरहा आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा केली. सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. मोहम्मद शामीला दोन तर शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली.