IND vs SA, Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार आणि रन मशीन विराट कोहलीने फॉर्मात परतल्यानंतर विक्रमावर विक्रम करण्यास सुरुवात केली आहे. गुवाहाटी येथे सुरु असलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात विराट कोहलीनं ताबडतोड 49 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान विराट कोहलीनं मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा पल्ला पार केला आहे. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.
गुवाहाटी येथे सुरु असलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात विराट कोहलीनं धावांचा पाऊस पाडला. विराट कोहलीनं 28 चेंडूत 175 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 49 धावांची खेळी केली. यामध्ये सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. विराट कोहलीनं सूर्यकुमार यादवला साथ दिली. दोघांनी झटपट 100 धावांची भागिदारी केली.
गुवाहाटीमध्ये विस्फोटक फलंदाजी करत विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा पल्ला पार केला. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. तर जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीनं 354 टी 20 सामन्यात 11 हजार धावांचा पल्ला टप्पा पार केला आहे.
ख्रिस गेल अव्वल -
टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये वेस्ट विंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. युनिवर्स बॉस ख्रिस गेल याने 463 सामन्यात 14 हजार 562 धावांचा पाऊस पाडला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट विंडिजचा कायरन पोलार्ड आहे. पोलार्डने 614 सामन्यातील 545 डावात 11 हजार 915 धावांचा पाऊस पाडलाय. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्याशोएब मलिकने 447 डावात 11 हजार 902 धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीनं 354 टी 20 सामन्यातील 337 डावात 11 हजार 030 धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. हिटमॅन रोहितनं 400 सामन्यात 10 हजार 587 धावा चोपल्या आहेत.