India vs England 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडियाला त्यांचे सर्व खेळाडू तयार करायचे आहेत. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय क्रिकेट संघाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आहे. टीम इंडियाचा धडाकेबाज अष्टपैलू रवींद्र जडेजाने वरुण चक्रवर्तीला पदार्पणाची कॅप दिली.
टी-20 मालिकेत इंग्रजांना आणलं रडकुंडीला!
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत वरुण चक्रवर्तीने शानदार कामगिरी केली होती. यामुळेच त्याला एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच्या एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले. आता रोहित शर्मानेही त्याला पदार्पणाची संधी दिली आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना आशा आहे की तो एकदिवसीय मालिकेतही काहीतरी अद्भुत करेल. वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत पाच सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या. त्याला संधी देण्यासाठी कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली आहे. जो दुखापतीमुळे टीम इंडियाबाहेर होता.
वरुण चक्रवर्ती हा भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये जास्त वय झाले असताना पदार्पण करणार दुसरा खेळाडू ठरला आहे. खरंतर, त्याने वयाच्या 33 वर्षे आणि 164 दिवसांत संघात पदार्पण केले. त्याच्या आधी हा विक्रम फारुख इंजिनिअरच्या नावावर होता, ज्यांनी 1974 मध्ये 36 वर्षे 138 दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
जास्त वय झाले असतानाही पदार्पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे 5 भारतीय खेळाडू
फारुख इंजिनियर - 36 वर्षे 138 दिवस विरुद्ध इंग्लंड (1974)
वरुण चक्रवर्ती – 33 वर्षे 134 दिवस विरुद्ध इंग्लंड (2025)*
अजित वाडेकर - 33 वर्षे 103 दिवस विरुद्ध इंग्लंड (1974)
दिलीप दोशी - 32 वर्षे 350 दिवस विरुद्ध ऑस्ट्रेलिया (1980)
सय्यद आबिद अली - 32 वर्षे 307 दिवस विरुद्ध इंग्लंड (1974)
टीम इंडियामध्ये आणखी एक बदल
या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीही पुनरागमन करत आहे. दुखापतीमुळे तो मालिकेतील पहिला सामना खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत त्याला प्लेइंग-11मध्ये समाविष्ट केल्यामुळे आणखी एक बदल करण्यात आला. विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे यशस्वी जैस्वालला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात तो फक्त 15 धावा करू शकला.
टीम इंडियाची प्लेइंग -11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.