Vaibhav Suryavanshi Ayush Mhatre Travel England : सध्या भारतात आयपीएल 2025 चा धुमाकूळ सुरू आहे आणि या स्पर्धेत एकामागून एक धमाकेदार सामने खेळले जात आहेत. आयपीएल संपल्यानंतर भारत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. या काळात भारताचा 19 वर्षांखालील संघही इंग्लंडचा दौरा करेल. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, भारतीय अंडर-19 संघाच्या या दौऱ्यात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे देखील संघाचा भाग असतील.

या दौऱ्यात टीम इंडिया 5 एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ 21 जून रोजी ब्रिटनमध्ये दाखल होईल. या दौऱ्यात 14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांसारख्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळू शकते. दोन्ही खेळाडू सध्या आयपीएल 2025 मध्ये चांगलीच धमाल करत आहेत. वैभव हा राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. तर, आयुष चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. या दोघांव्यतिरिक्त, इतर काही खेळाडूंनाही संघात समाविष्ट केले जाऊ शकते. 

पुढील वर्षी जानेवारीमध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कपसाठी सज्ज होत असताना, इंग्लंडचा हा आगामी दौरा भारताच्या 19 वर्षांखालील संघासाठी महत्त्वाची तयारी म्हणून काम करेल. भारताचा 19 वर्षांखालील संघ शेवटचा सामना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये युएईमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये खेळला होता, जिथे ते अंतिम फेरीत पोहोचले होते परंतु अखेर बांगलादेशकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.

टीम इंडियाला आता तो पराभव विसरून एक नवी सुरुवात करायची आहे. जर वैभव आणि आयुषला संधी मिळाली तर ते संघासाठी खूप फायदेशीर ठरेल. दोन्ही खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये आहेत. स्पर्धेतील 47 व्या सामन्यात केवळ 35 चेंडूत शतक ठोकून वैभवने खळबळ उडवून दिली आहे. त्याने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांनाच आपले चाहते बनवले आहे. आयुषने आतापर्यंत मिळालेल्या संधींबद्दल निराशा केलेली नाही.

भारताच्या 19 वर्षांखालील संघाच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक

एकदिवसीय मालिका :

पहिला एकदिवसीय सामना: 27 जून, होव्ह

दुसरा एकदिवसीय सामना: 30 जून, नॉर्थम्प्टन

तिसरा एकदिवसीय सामना: 2 जुलै, नॉर्थम्प्टन

चौथा एकदिवसीय सामना:  5 जुलै, वॉर्सेस्टर

पाचवा एकदिवसीय सामना: 7 जुलै, वॉर्सेस्टर

कसोटी मालिका :

पहिली कसोटी: 12-15 जुलै

दुसरी कसोटी: 20-23 जुलै, चेम्सफोर्ड