India vs Australia Semifinal Under 19 World Cup 2022: क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला आणि मैदानाबाहेर कोरोनाला धूळ चारणाऱ्या टीम इंडियासमोर आज उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान आहे. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाला नमवत अंतिम फेरीत धडक मारण्यास टीम इंडिया उत्सुक आहे. 


19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक मोहिमेत टीम इंडियासमोर संकटे आली होती. टीम इंडियातील प्रमुख खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. टीम इंडियाने साखळी गटातील चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेशवर मात करत टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय संघ सलग चौथ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळणार आहे. 


टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला


कोरोना महासाथीचा परिणाम टीम इंडियाच्या विश्वचषक मोहिमेवरही झाला होता. मागील दोन वर्षात कोणतेही राष्ट्रीय शिबीर अथवा मोठे स्पर्धा सामने झाले नव्हते. विश्वचषक सुरू होण्याआधी टीम इंडियाने आशिया चषक सहभाग घेतला होता. आता विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचे मोठे आव्हान आहे. 


भारतीय संघाचा कर्णधार यश धुल, शेख रशीद, हरनूर सिंह, अंगकृष रघुवंशी, राज बावा यांच्या खांद्यावर फलंदाजीची भिस्त असणार. तर, वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर, फिरकीपटू विकी ओस्तवाल, कौशल तांबे यांना प्रभावी मारा करावा लागणार आहे. 


भारतीय संघाने विश्वचषकातील सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली होती तर, ऑस्ट्रेलियन संघदेखील उपांत्य फेरीत भारतीय संघाला पराभवाचा धक्का देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक दोन वेळेस जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, भारताने बांगलादेशला पराभवाची धूळ चारली होती. 


आकडेवारी भारताच्या बाजूने 


19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वर्चस्व दिसून आले आहे. नॉकनाउट सामन्यांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात तीन सामने झाले. या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला. टीम इंडियाने 2012 आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाला नमवत 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. तर, 2000 मध्ये पार पडलेल्या विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. 


सामन्याची वेळ?


भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 6.30 वाजता उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल. स्टार स्पोर्टस नेटवर्कच्या वाहिन्यांवर हा उपांत्य फेरीचा सामना पाहता येऊ शकतो.