India Win The World Cup 2011 On This Day: भारतीय क्रिकेट संघाने आजच्याच दिवशी म्हणजे 2 एप्रिल 2011 रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवशीय विश्वचषक पटकावले होते. श्रीलंकेचा पराभव करून एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. संघाला विजेतेपद मिळवून देण्यात गौतम गंभीरच्या 97 धावांच्या खेळी आणि कर्णधार धोनीच्या 91 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.  भारतीय क्रिकेट संघाला 2011 मधील विश्वचषक जिंकून आज 13 वर्षे पूर्ण झाले.


मुंबईच्या वानखेडे मैदानावर धोनीचा विजयी षटकार आजही क्रिकेटप्रेमींच्या हृदयात जिवंत आहे. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारताच्या संघातील सर्व खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर भारताने तब्बल 28 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला होता. याआधी 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कर्णधार धोनीला 'प्लेअर ऑफ द मॅच', तर युवराज सिंग 'प्लेअर ऑफ द सीरीज' पुरस्कार देण्यात आला. याविश्वचषकानंतर भारतीय संघाला एकही विश्वचषक जिंकता आलेला नाही.


सामना नेमका कसा झाला?


वानखेडेवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 274 धावा केल्या. संघासाठी महेला जयवर्धनेने 88 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 103 धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय कुमार संगकाराने 67 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 48 धावा केल्या होत्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 48.2 षटकांत विजय मिळवला. संघासाठी गौतम गंभीरने 122 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 97 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय धोनीने 79 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 91 धावा केल्या होत्या. धोनीसोबत युवराज सिंगने 24 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्यावर नाबाद राहिला.






विश्वचषकांत भारतीय खेळाडूंची कामगिरी-


सचिन तेंडूलकर - 482 धावा.
गौतम गंभीर - 393 धावा.
विरेंद्र सेहवाग - 380 धावा.
युवराज सिंग - 362 धावा (15 विकेट्स).
विराट कोहली - 282 धावा.
एमएस धोनी - 91* अंतिम फेरीत.
सुरेश रैना - 34* वि ऑस्ट्रेलिया, 36 उपांत्य फेरीत.
झहीर खान - 21 विकेट्स.
मुनाफ पटेल - 11 विकेट्स.
हरभजन सिंग - 9 विकेट्स.