Sachin Tendulkar Birthday : आज 24 एप्रिल. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, विक्रमवीर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा वाढदिवस. सचिनने आज 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे. सचिनला क्रिकेटचा देव असे म्हटले जाते. कारण क्रिकेटमध्ये सचिनने अनेक मोठे विक्रम केले आहेत. खेळाच्या माध्यमातून त्याने आपल्या असंख्य चाहत्यांना आनंद दिला आहे. सध्या आयपीएल सुरु आहे. सचिन हा मुंबई इंडियन्स या संघाचा अविभाज्य भाग आहे. विशेष म्हणजे सचिनच्या वाढदिवसादिवशीच आज मुंबई इंडियन्सचा सामान होणार आहे. त्यामुळे वाढदिवसादिवशी मुंबई इंडियन्सचे खेळाडू सचिनला विजयाची भेट देणार का? हे पाहावं लागेल.
क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिनचा जन्म हा 24 एप्रिल 1973 ला मुंबईच्या वांद्रे इथे झाला. सचिन सलग 24 वर्ष क्रिकेट खेळला. त्याने वयाच्या 16 वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. सचिन पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. यामध्ये त्याने 15 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात मात्र, जखमी होऊनही सचिनने अर्धशतकी खेळी केली होती.
सचिनची कारकिर्द
सचिन तेंडूलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सचिनने 200 कसोटीत 15,921 धावा केल्या आहेत. तर 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 हजार 426 धावा केल्या आहेत. सचिनच्या नावावर कसोटीत 51 आणि वनडेत 49 शतके आहेत. सचिन एक टी-20 सामना खेळला, ज्यामध्ये त्याने 10 धावा केल्या होत्या.
1990 मध्ये पहिले कसोटी शतक
सचिनने 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्यानंतर ऑगस्ट 1990 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाने पहिल्या डावात 519 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 432 धावाच करु शकला. यानंतर इंग्लंडने 320 धावा करताना 408 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर लक्षाचा पाठलाग करत भारताने 183 धावांवर 6 विकेट गमावल्या. अशा परिस्थितीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सचिनने नाबाद 119 धावा केल्या. यासह अखेरच्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात 6 विकेट्सवर 343 धावा करत सामना अनिर्णित ठेवला होता. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा सचिन तेंडूलकर हा पहिला फलंदाज होता. 24 फेब्रुवारी 2010 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सचिनने हा विक्रम केला.