Year Ender 2021: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा क्रिडा क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या काळात अनेक लहान- मोठ्या स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येऊ लागल्यानं पुन्हा एकदा खेळाडू मैदानात उतरले आहेत. दरम्यान, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टीनं यंदाचं वर्ष खूप महत्वाचं होतं. याचवर्षी यूएईमध्ये टी-20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज आपण टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलणार आहोत. या यादीत पाकिस्तानचे दोन खेळाडू अव्वल स्थानावर आहेत. तर, या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. 


1. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan)
पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय. गेल्या महिन्यात पार पडलेल्या टी-20 विश्वचषकातही त्यानं चांगली कामगिरी करून सर्वांनाच चकित केलं होतं. रिझवाननं यावर्षी 29 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 1 हजार 239 धावा केल्या आहेत. यादरम्यान रिझवाननं एक शतक आणि 11 अर्धशतकं झळकावली आहेत.


2. बाबर आझम (Babar Azam)
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसाठीही 2021 हे वर्ष संस्मरणीय ठरलंय. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघानं टी-20 विश्वचषक 2021 मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच त्यानं वैयक्तिक कामगिरी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. बाबरनं यावर्षी 29 टी-20 सामन्यांमध्ये 860 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. 


3. मार्टिन गप्टील  (Martin Guptill)
न्यूझीलंडचा तडाखेबाज फलंदाज मार्टिन गप्टीलनं यावर्षी टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातलाय. टी-20 विश्वचषकासह त्यानं भारताविरुद्ध टी-20 मालिकेतही आक्रमक फलंदाजी केलीय. त्यानं या वर्षी एकूण 18 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 678 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं पाच अर्धशतकं झळकावलीय. 


4. मिचेल मार्श (Mitchell Marsh)
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिशेल मार्शनं यावर्षी चांगली फलंदाजी करून सर्वांना आकर्षित केलंय. मार्शनं यावर्षी आतापर्यंत 21 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्यानं 627 धावा केल्या आहेत. यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. 


5. जॉस बटलर (Jos Buttler)
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॉस बटलरला आक्रमक खेळीसाठी ओळखलं जातं. यावर्षीही त्यानं मैदान गाजवलं आहे. बटलरनं यावर्षी 14 टी-20 सामने खेळले असून त्यात 589 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकाचा समावेश आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-