India Vs England 2nd Test: इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर असून टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) क्रिकेट संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पण ही पाच सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियासाठी मात्र आव्हानात्मक ठरतेय एवढं मात्र नक्की. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दुसऱ्या कसोटीत इग्लंडला नमवण्यासाठी टीम इंडियाचे धुरंदर सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत. पण यामध्ये त्यांचा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. 


इंग्लंडसोबतची कसोटी मालिका सुरू झाल्यापासूनच टीम इंडियाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. याचं सर्वात मोठं कारण भारतीय क्रिकेट संघाला सातत्यानं बसणारे धक्के. सर्वात पहिला धक्का म्हणजे, टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून वैयक्तिक कारणासाठी त्यानं घेतलेली माघार. त्यानंतरचा धक्का बसला तो टीम इंडियाचा हुकुमी एक्का मोहम्मद शामीनं दुखापतीमुळे घेतलेली माघार. यानंतर टीम इंडिया विराट कोहली आणि मोहम्मद शामीशिवाय मालिकेतील पहिल्या हैदराबाद कसोटीत उतरला आणि अवघ्या 4 दिवसांत 28 धावांनी पराभव पत्करावा लागला. 


चार दिग्गज खेळाडूंशिवाय खेळावी लागणार इंग्लंडविरोधात दुसरी कसोटी


भारतीय क्रिकेट संघासमोरील अडचणी काही कमी होण्याचं नाव घेईनात. कोहली आणि शामीच्या धक्क्यातून सावरतात, तेवढ्यात आता इंग्लंडविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणी खूप वाढल्या आहेत. 


दुसरा कसोटी सामन्या टीम इंडियाला चार दिग्गजांशिवाय खेळावा लागणार आहे. या 4 दिग्गज खेळाडूंशिवाय भारतीय क्रिकेट संघाला दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करणं फार कठीण जाणार आहे. चौघांच्याही अनुपस्थितीत रोहित शर्मासह इतर खेळाडूंवर अनेक जबाबदाऱ्या वाढणार आहेत. भारतीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळला गेला. इंग्लंडनं हा सामना 28 धावांनी जिंकला होता. आता दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. 


टीम इंडियाचे चार दिग्गज दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर 



  • विराट कोहली : वैयक्तिक कारणासाठी माघार  

  • रवींद्र जाडेजा : पायाला दुखापत 

  • केएल राहुल : पायाला दुखापत  

  • मोहम्मद शमी : पायाच्या टाचेला दुखापत 


'या' खेळाडूंवर दुसऱ्या कसोटी सामन्याची धुरा


पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला विराट कोहली आणि मोहम्मद शामीची उणीव भासली. या दोघांची भरपाई कोणी करू शकलं नाही. पण आता दुसऱ्या कसोटीत जाडेजा आणि केएल राहुलच्या जागी रजत पाटीदार आणि सर्फराज अहमद यांना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकतं. तर खराब कामगिरीशी झगडत असलेल्या शुभमन गिलला वगळलं जाऊ शकतं. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय क्रिकेट संघ रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर/कुलदीप यादव या तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. त्यामुळे टीम इंडियाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत होऊ शकते आणि इंग्लंडला भारी पडू शकते. 


दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य टीम इंडिया 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंगटन सुंदर आणि सौरभ कुमार.