Rohit Sharma, India Vs England 2nd Test: टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Cricket Series) दुसरा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. आजचा सामना विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील वायएस राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल.


टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारीला हैदराबादमध्ये झाला होता. ज्यामध्ये भारतीय क्रिकट संघाला चौथ्या दिवशीच 28 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. रोहित ब्रिगेड बरोबरी साधण्यासाठी मैदानात उतरेल. 






भारतीय क्रिकेट संघ चार दिग्गजांशिवाय मैदानात उतरणार 


विशाखापट्टणम कसोटीत कर्णधार रोहित शर्माची लिटमस टेस्ट होणार आहे. याचं कारण इंग्लंड विरुद्धच्या कसोटी समान्यासाठी संघात दिग्गज विराट कोहली, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजा यांच्यासारखे स्टार खेळाडू नाहीत. अशा परिस्थितीत, या चार दिग्गजांच्या अनुपस्थितीत, रोहितला सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधावी लागेल. याशिवाय सतत फ्लॉप होत असलेल्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्याबाबतही रोहितला मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. तसेच सरफराज खान आणि रजत पाटीदार यांना संधी देण्याचा विचार करावा लागेल. दोघांना संधी मिळाल्यास हा त्यांचा पदार्पणाचा सामना असेल.


विझागमध्ये रोहितचा रेकॉर्ड एकदम भारी 


दुसरी बाजू पाहायला गेलं तर विजाग स्टेडियममध्ये रोहितचा रेकॉर्ड एकदम भारी आहे. हिटमॅन रोहित शर्मानं या स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या गेल्या 4 आंतरराष्ट्रीय डावांत 3 शतकं झळकावली आहेत. या मैदानावर रोहितनं शेवटचा एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्यानं 13 धावा केल्या. पण त्याआधी, 18 डिसेंबर 2019 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामना खेळला गेला. त्या सामन्यात रोहितनं 159 धावांची तुफानी खेळी केली होती. त्यानंतर त्यानं 5 षटकार आणि 17 चौकार मारले. त्याआधी रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विझागमध्ये एकमेव कसोटी खेळला होता. 


एकमेव कसोटीच्या दोन्ही डावांत शतकी खेळी


रोहितनं विझागमधील कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतकं झळकावली होती. त्यानंतर रोहितनं पहिल्या डावात 176 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात 127 धावा झाल्या. अशाप्रकारे, रोहितनं या विझाग मैदानावर आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या शेवटच्या 4 डावांमध्ये 3 शतकं झळकावली आहेत.


दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.