Asia Cup Under-19 2025 Points Table : अंडर 19 आशिया कप 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 6 सामने खेळवले गेले आहेत. ग्रुप A मधील रविवारी झालेल्या महत्त्वाच्या लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानला लोळवलं. या विजयासह टीम इंडियाने सेमीफायनलचे तिकीट निश्चित केले आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने स्पर्धेची सुरुवात दणदणीत केली. पहिल्याच सामन्यात भारताने युएईला तब्बल 234 धावांनी पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर 90 धावांनी विजय मिळवत भारताने ग्रुप A मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले.

Continues below advertisement

रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात युएईने मलेशियावर 78 धावांनी मात केली. या निकालानंतर भारताची सेमीफायनलमधील जागा अधिकृतपणे पक्की झाली असून ग्रुप A मध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे. दुसरीकडे, सलग दुसऱ्या पराभवानंतर मलेशियाचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

पाकिस्तानसाठी सेमीफायनलचा मार्ग मोकळा...

Continues below advertisement

अंडर-19 आशिया कप 2025 मध्ये ग्रुप A मध्ये भारत, पाकिस्तान, यूएई आणि मलेशिया हे चार संघ आहेत. पाकिस्तानने आपल्या पहिल्याच सामन्यात मलेशियावर तब्बल 297 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात भारताकडून 90 धावांनी पराभव झाला असला तरीही पाकिस्तानसाठी सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची दारे अजूनही उघडी आहेत. 

पाकिस्तानला आता आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात तुलनेने कमकुवत यूएईचा पराभव करायचा आहे. या स्पर्धेत यूएईने दोन सामने खेळून एक विजय मिळवला आहे, तर पाकिस्ताननेही दोन सामन्यांत एक सामना जिंकला आहे. त्यामुळे 16 डिसेंबर रोजी होणारा पाकिस्तान–यूएई सामना निर्णायक ठरणार असून, या सामन्यातील विजेता संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानचे पारडे जड मानले जात आहे.

मलेशिया स्पर्धेतून बाहेर

नेट रनरेटच्या बाबतीत पाकिस्तान यूएईपेक्षा खूप पुढे आहे. मलेशियावर 297 धावांनी मिळवलेल्या विजयामुळे पाकिस्तानचा नेट रनरेट +4 पेक्षा जास्त झाला होता, जो भारताकडून पराभवानंतरही +2.070 आहे. दुसरीकडे, यूएईचा नेट रनरेट -1.608 आहे. त्यामुळे पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी फक्त यूएईवर विजय मिळवणे पुरेसे ठरणार आहे. या गटातील चौथा संघ मलेशिया असून, सलग दोन पराभवांमुळे तो आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

ग्रुप B काय आहे सेमीफायनलचं समीकरण?

ग्रुप B कडे पाहिल्यास या गटातील सर्व संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एकच सामना खेळला आहे. श्रीलंका पहिल्या तर बांग्लादेश दुसऱ्या स्थानावर आहे. पहिला सामना गमावलेला अफगाणिस्तान तिसऱ्या, तर नेपाळ चौथ्या स्थानावर आहे. अंडर 19 आशिया कप 2025 मध्ये ग्रुप स्टेजनंतर दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.

हे ही वाचा -

Michael Vaughan Sydney Terrorist Attack : अंदाधुंद गोळीबार, रेस्टॉरंटमध्ये लपला म्हणून क्रिकेटपटू वाचला, ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत समुद्रकिनाऱ्यावर मृतदेहांचा खच! नेमकं काय घडलं?