India Playing 11 Vs England for 2nd Test Match: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात खेळणाऱ्या टीम इंडियाची (Team India) आज अग्निपरीक्षा आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध (England) 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना आजपासून (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.


टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांपासून खेळवला जाईल. याआधी हैदराबादमध्ये मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाला अवघ्या 4 दिवसांत 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशाप्रकारे इंग्लंड संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.


कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढली 


इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून रोहित शर्माला कसोटी मालिकेत बरोबरी साधायची आहे. पण त्याआधी प्लेईंग 11 ची निवड करणं ही भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी डोकेदुखी ठरणार आहे. या सामन्यापूर्वी काही स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. अशा परिस्थितीत दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग-11 मध्ये काही मोठे बदल होऊ शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय कसोटी सामन्यातून विराट कोहली, रवींद्र जाडेजा, केएल राहुल आणि मोहम्मद शामी बाहेर आहेत. तर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर अतिशय खराब फॉर्मशी झगडत आहेत. कर्णधार रोहित शर्माच्याही बॅटमधून फारशा धावा निघालेल्या नाहीत, अशा परिस्थितीत दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात. 


आजपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दोघांना किंवा यांच्यापैकी एकाला प्लेईंग 11 मधून बाहेर ठेवलं जाऊ शकतं. यांच्याऐवजी रजत पाटीदार आणि सरफराज खानला संधी मिळू शकते. जर असं होत असेल, तर रजत पाटीदार आणि सरफराज यांच्यात डेब्यू सामनाही खेळवला जाईल. दरम्यान, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना प्लेईंग 11 मधून बाहेर ठेवलं जाण्याची शक्यता तशी फारच कमी आहे. जर दोघेही खेळले तर रजत किंना सरफराज यांच्यातील कोणा एकाला संधी मिळू शकते. 


गिल आणि श्रेयस खराब फॉर्मात 


शुभमन गिलनं गेल्या 6 कसोटी सामन्यांतील 11 डावांत एकदाही फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. गिलला अर्धशतकापर्यंतही मजल मारलेली नाही. त्याचं अर्धशतक मार्च 2023 मध्ये आलं होतं. तेव्हा त्यांनं ऑस्ट्रेलिया विरोधात अहमदाबाद कसोटीत 128 धावांची खेळी खेळली होती. तर श्रेयस अय्यरनं गेल्या 6 कसोटी सामन्यांतील 10 डावांपासून एकही अर्धशतक झळकावलेलं नाही. त्यानं शेवटी 12 डिसेंबर 2022 मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. तर बांगलादेश विरोधातील मीरपूर कसोटीत पहिल्या डावांत 87 धावा केल्या होत्या. अशातच दोघांपैकी एकाला तरी कसोटी सामन्यातून आराम दिला जाऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.