IND vs AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया आपल्याच जाळ्यात अडकल्याचं दिसून येत आहे. नागपूर आणि दिल्लीप्रमाणेच इंदूरमध्येही भारतीय संघ व्यवस्थापनाने फिरकी गोलंदाजीला फायदेशीर अशा प्रकारचा पिच बनल्याची माहिती समोर येत होती. पण इंदूर कसोटीत पहिली फलंदाजी घेतल्यावर भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फिरकी अटॅकसमोर गुडघ्यावर बसल्याचं दिसून आलं आहे. भारताचे सर्व आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले असून 100 धावांच्या आतच भारताने 7 गडी गमावले (बातमी लिहिताना) आहेत.

  


इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सुरुवातीला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन यांच्याकडे चेंडू सोपवला. येथे भारतीय फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे लगेचच कर्णधार स्मिथने आपल्या फिरकीपटूंकडे चेंडू सोपवताच भारतीय संघ ढासळताना दिसला. एकही विकेट न गमावता 27 धावा केल्यानंतर भारतीय संघाने पुढील 18 धावांत 5 विकेट गमावल्या. ज्यानंतर 26 षटकानंतर भारताची अवस्था 84 वर 7 बाद अशी होती. विशेष म्हणजे या सर्व 7 विकेट्स ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी घेतल्या. मॅथ्यू कुहनेमन आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 3 तर टॉड मर्फीने एक विकेट घेतली आहे. 


ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंची शानदार गोलंदाजी


दिल्ली कसोटीतून रेड-बॉल क्रिकेटमध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू कुहनेमनने दुसऱ्या कसोटीत कहर केला आहे. कुहनेमनला पदार्पणाच्या कसोटीत केवळ दोन विकेट मिळाल्या. पण आपल्या दुसऱ्या कसोटीत कुहनेमनने पहिल्या चार षटकांतच टीम इंडियाला 3 धक्के दिले. कुहनेमनने प्रथम कर्णधार रोहित शर्माला (12 धावा) यष्टिमागे झेलबाद केलं. त्यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात सलामीवीर शुभमन गिलला (21 धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कुहनेमननंतर नॅथन लायनने विकेट्सचा पाऊस पाडला आणि चेतेश्वर पुजारा (1 धाव) आणि रवींद्र जडेजा (4 धावा) यांना बाद केलं. सामन्याच्या बाराव्या षटकातच कुहनेमनने श्रेयस अय्यरला (0) बोल्ड करुन भारतीय संघाला पाचवा धक्का दिला. त्यानंतर मर्फीने विराटची (22 धावा) मोठी विकेट घेतली. मग केएसल भरतही लायनच्या गोलंदाजीवर 17 धावा करुन बाद झाला आहे.


WTC Final मध्ये एन्ट्रीसाठी विजय महत्त्वाचा 


या मालिकेत एकूण 4 कसोटी सामने खेळवले जाणार होते, ज्यातील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करु शकतो. 


हे देखील वाचा-