Mohammed Shami Batting in Nets : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना (IND vs AUS 4th test) गुरुवारपासून म्हणजेच 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याआधी इंदूरमध्ये खेळवण्यात आलेली तिसरी कसोटी गमावल्यानंतर अखेरचा सामना दोन्ही संघासाठी 'करा किंवा मरो' असाच असेल. दरम्यान या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसला. नागपुरात झालेल्या पहिल्या सामन्यात शमीने फलंदाजी करताना 37 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. ज्यात त्याने एक खास रेकॉर्डही नावे केला होता.


विराट कोहलीचा षटकारांचा विक्रमही मोडला


पहिल्या सामन्यात शमीच्या डावात एकूण 3 षटकारांचा समावेश होता. या षटकारांमुळे त्याने विराट कोहलीचा षटकारांचा खास विक्रम मोडला होता. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 24 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर मोहम्मद शमीने आपल्या कसोटी कारकिर्दीत फलंदाजी करताना 25 षटकार पूर्ण केले आहेत.


फलंदाजीच्या सरावाचा फोटो केला शेअर


चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी शमीने त्याच्या सोशल मीडियावर (Shami Social Media) एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. शमी नेटमध्ये दिसत आहे. त्याने हातात पॅड, थाई पॅड आणि हातमोजे घातले आहेत. यावेळी तो हेल्मेट नव्हे तर टोपी घातलेला दिसला. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, "पुढे येऊन चार्ज करण्याची संधी कधीही सोडू नका."


पाहा PHOTO-






बॉर्डर गावस्कर मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे 


ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेत (BGT 2023) टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला चौथा सामना जिंकावा लागेल किंवा बरोबरीत सोडवावा लागेल. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. भारतीय संघ चौथी कसोटी हरला तर श्रीलंका आणि न्यूझीलंड (SL vs NZ) यांच्यातील कसोटीच्या निकालावर संघाला अवलंबून राहावे लागेल.


हे देखील वाचा-