NAM vs Oman Match Highlights : टी20 विश्वचषक 2024 मधील तिसरा सामना नामिबिया आणि ओमान यांच्यामध्ये झाला. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. 109 धावांवर सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये नामिबियानं विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने सहा चेंडूत 21 धावा करत ओमानला 22 धावांचं आव्हान दिलं होतं. नामिबियाच्या गोलंदाजीसमोर ओमानला फक्त दहा धावा करता आल्या. सुपर ओव्हरमध्ये नामिबियासाठी डेविड विजे हिरो ठरला. त्यानं फलंदाजी आणि गोलंदाजीत शानदार कामगिरी केली.
प्रथम फलंदाजी करताना ओमानने 19.4 षटकात 109 धावाच केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या नामिबियाची सुरुवात अतिशय खराब झाली. पण 20 षटकानंतर नामिबियालाही 109 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना टाय झाला अन् सुपर ओव्हर घेण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये नामिबियानं विजय मिळवत विश्वचषकाची शानदार सुरुवात केली.
सुपर ओव्हरचा रोमांच, डेविड विजेची कमाल
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 21 धावा फलकावर लावल्या. नामिबियासाठी डेविड विजे यानं पहिल्या दोन चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार ठोकत दहा धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दोन आणि चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर स्ट्राईकवर आलेला कर्णधार गेरहार्ड इरास्मस यानं दोन चेंडूत दोन चौकार ठोकत आठ धावा केल्या. नामिबियानं सहा चेंडूत 21 धावा फलकावर लावल्या.
सुपर ओव्हरमध्ये 22 धावांचा पाठलाग करताना ओमानला फटकेबाजी करता आली नाही. डेविड विजे यानं भेदक मारा केला. विजे यानं सुपर ओव्हरमध्ये फक्त दहा धावा खर्च करत एक विकेट घेतली. विजे याच्या पहिल्याच चेंडूवर ओमानच्या नसीम खुशी यानं दोन धावा केल्या. त्यानंतर विजे यानं दुसरा चेंडू निर्धाव फेकला. तिसऱ्या चेंडूवर त्यानं नसीमचा त्रिफाळा उडवला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या आकिब यानं पुढील दोन चेंडूवर एक एक धाव घेतली. अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. ओमानला सुपर ओव्हरमध्ये फक्त दहा धावा करत्या आल्या.
नामिबिया-ओमान 109 धावा, सामना टाय, सुपर ओव्हरमध्ये निकाल
ओमानने प्रथम फलंदाजी करताना 109 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल नामिबियाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर नामिबियानं विकेट गमावली. मायकल बॅन लिंहन याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर निकोलास डेविन आणि जान फ्रायलिनक यांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागिदारी केली. 9 व्या षटकात निकोलास डेविन बाद झाला. डेविन याने 31 चेंडूमध्ये दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या.
दोन विकेट गेल्यानंतर जान फ्रायलिनक आणि गेरहार्ड इरास्मस यांनी 31 (36 चेंडू) धावांची भागिदारी केली. ही जोडी धोकादायक ठरतेय, असे वाटत होते. त्यावेळी अयान खान यानं गेरहार्ड याला तंबूत पाठवले. गेरहार्ड याने 16 चेंडूमध्ये एक चौकाराच्या मदतीने 13 धावा केल्या. त्यानंतर जेजे स्मितच्या रुपाने नामिबियानं विकेट गमावल्या. स्मितने 12 चेंडूमध्ये एका चौकाराच्या 8 धावा केल्या. जान फ्रायलिन्क मोक्याच्या क्षणी बाद झाला. त्याने 48 चेंडूमध्ये सहा चौकाराच्या मदतीने 45 धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती, पण नामिबियाला एकच विकेट मिळाली.