T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) भारतीय संघाची विजयी मोहीम सुरूच आहे. आयर्लंडसह भारतीय संघाने साखळी टप्प्यातील सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव केला. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुपर-8 फेरीची सुरुवात शानदार शैलीत केली. सुपर-8 फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सहज पराभव केला. भारतीय फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजही आपले काम चोख बजावत आहेत, पण या स्पर्धेतील जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) आकडेवारी आश्चर्यकारक आहे.


जसप्रीत बुमराहची आकडेवारी आश्चर्यकारक...


टी-20 विश्वचषकात जसप्रीत बुमराहचे आकडे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या स्पर्धेत आतापर्यंत जसप्रीत बुमराहने 15 षटके टाकली आहेत, ज्यामध्ये विरोधी संघाचे फलंदाज केवळ 3 चौकार आणि 1 षटकार मारू शकले आहेत. तसेच जसप्रीत बुमराहने विरोधी संघातील 8 फलंदाजांना आपला बळी बनवले आहे. जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे महत्त्वाच्या प्रसंगी भारतासाठी विकेट घेत आहे आणि धावा रोखण्याचे काम करत आहे, त्यावरून तो या स्पर्धेत भारतासाठी इम्पॅक्ट खेळाडू ठरणार आहे, हे स्पष्ट होते.






आज भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना-


आज भारतीय संघ सुपर-8 फेरीचा दुसरा सामना खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला बांगलादेशचे आव्हान असणार आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. 24 जून रोजी दोन्ही संघ भिडतील. मात्र, आज भारतीय संघ बांगलादेशला हरवून उपांत्य फेरीतील आपला मार्ग सोपा करायचा आहे. सध्या ऑस्ट्रेलिया ग्रुप-1 मध्ये अव्वल आहे. तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे समान 2-2 गुण असले तरी ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट चांगला आहे. आज जर भारतीय संघ बांगलादेशला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर तो गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचेल. त्याचवेळी मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर घसरेल.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा-


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारत आणि बांगलादेशला आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकास भागीदार आहे आणि आम्ही बांगलादेशसोबतच्या आमच्या संबंधांना सर्वाधिक प्राधान्य देतो, असंही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.






बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.