टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या महामुकाबल्याचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. येत्या रविवारी (24 ऑक्टोबर) भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. मात्र, त्याआधी या सामन्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आणि उत्सुकता दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये आहे. दरम्यान, या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली (Virat Kohli) करीत आहे. तर, पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी बाबर आझम (Babar Azam) यांच्यावर सोपवली गेली आहे. मात्र, या दोघांपैकी कोणता कर्णधार सर्वश्रेष्ठ आहे? अशा चर्चांनाही उधाण आले आहे. कारण, हा सामना दोन्ही संघाच्या कर्णधाराच्या नेतृत्वावर अवलंबून असणार आहे.
विश्वचषकात भारताविरुद्ध सामन्यात पाकिस्तानला एकदाही विजय मिळवता आला नाही. या सामन्यात विराट कोहलीचा संघ विजयी दौड कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर, बाबर आझम यांच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे या सामन्याची दोन्ही संघाच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तर, या सामन्याआधी दोन्ही कर्णधारांच्या आकडेवारीवर एकदा नजर टाकुयात.
विजयाची टक्केवारी-
विराट कोहली: विराट कोहलीने आतापर्यंत 45 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. यापैकी 27 सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे. तर, 14 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. याशिवाय, 2 सामने रद्द झाले आहेत आणि 2 अनिर्णयीत ठरले आहेत. विराट कोहलीची विजयाची टक्केवारी 65.11 टक्के ऐवढी आहे.
बाबर आझम: पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने 28 टी-20 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 15 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. तर, 8 सामन्यात पराभूत झाले आहेत. यातील 4 सामने अनिर्णयीत ठरले आहेत. बाबर आझमची विजयाची टक्केवारी 65.21 इतकी आहे.
ताकद-
विराट कोहली: विराट कोहलीचा पाकिस्तान विरोधात चांगला रेकॉर्ड आहे. मागील 3 टी-20 सामन्यात पाकिस्तानचा संघ विराटला आऊट करू शकला नाही. विराट कोहलीला मोठ्या सामन्यातील खेळाडू मानले जाते. तसेच पाकिस्तान विरोधात विराट कोहलीकडून आक्रमक खेळी पाहायला मिळते.
बाबर आझम: बाबर आझम तडाखेबाज खेळी करणारा खेळाडू आहे. त्याला मोठ्या संघाविरोधात खूप कमी संधी मिळाली आहे. परंतु, शॉट सलेक्शनबाबत त्याची विराट कोहलीशी तुलना केली जाते. काही पाकिस्तानी क्रिकेटर बाबर आझमचा कव्हर ड्राईव्ह विराट कोहलीपेक्षा अधिक चांगला असल्याचे बोलतात. बाबर आझम मैदानात शांत असतो. सध्या त्याच्या नेतृत्वात पाकिस्तान चांगल प्रदर्शन करीत आहे.
कमजोरी-
विराट कोहली: आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या दोन वर्षात विराटच्या बॅटमधून मोठी खेळी पाहायला मिळाली नाही. परंतु, यावर्षीच्या आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. यामुळे विश्वचषकातही अशीच कामगिरी कायम ठेवेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
बाबर आझम: आझम पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी-20 मध्ये सामना खेळणार आहे. यामुळे आझमसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्याचे मागील 5 एकदिवसीय सामन्यात एकही अर्धशतक नाही