Suryakumar Yadav Ind Vs Pak No Shake Hands Asia Cup 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) काल भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासीयांची भावना होती. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर देशभरातून अनेक चाहत्यांची पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, अशा भावना व्यक्त केल्या. देशभरातून विविध प्रतिक्रिया येत होत्या. परंतु टीम इंडियाच्या खेळाडूंनी सर्व भारतीयांच्या भावनेचा आदर केला. सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.
हस्तांदोलन का टाळलं?; सूर्यकुमार यादव सांगितलं कारण-
टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं देखील टाळलं. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये सूर्यकुमार यादवने पाकच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन का टाळलं, याचं कारण सांगितलं आहे. आमचे सरकार आणि बीसीसीआय, आम्ही एकत्र होतो. एकत्र, आम्ही इथे आलो, आम्ही एक निर्णय घेतला आणि मला असे वाटते की, आम्ही फक्त खेळ खेळण्यासाठी इथे आलो आहोत. आणि आम्ही त्यांना (पाकिस्तानला) योग्य उत्तर दिले. आयुष्यात खेळाडूंच्या भावनेपुढे फार कमी गोष्टी असतात, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
सूर्यकुमार यादवे जिंकली भारतीयांची मनं-
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासीयांची भावना होती. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे भारताने सामना जिंकताच सूर्यकुमार यादवने सर्वांची मनं जिंकली. सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. मला काहीतरी सांगायचं आहे आणि त्यासाठी हे ठिकाण अधिक योग्य आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्यदलाला समर्पित करू इच्छितो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहोत आणि आम्हालाही संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी आणखी कारण देता यावं, अशी आम्ही आशा करतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
काय सांगतो ICC आणि ACC चा नियम?
क्रिकेटच्या कोणत्याही नियमपुस्तिकेत सामना संपल्यानंतर हस्तांदोलन अनिवार्य आहे, असे लिहिलेले नाही. हस्तांदोलन हा कसलाही नियम नसून खेळभावनेचा (Sportsmanship of Cricket) भाग मानला जातो. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक सामन्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भेटतात.
टीम इंडियावर कारवाई होणार का?
हस्तांदोलन करण्याचा नियमच नाही, त्यामुळे टीम इंडियावर दंडाचा किंवा कारवाई प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, जाणूनबुजून प्रतिस्पर्धी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यास, त्याला खेळभावनेच्या विरुद्ध कृती मानले जाते.
भारत-पाकिस्तान सामना कसा राहिला?
सामन्याचं चित्र असं होतं की सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला वेठीस धरलं. पहिल्याच षटकात विकेट मिळाल्यानंतर पाकिस्तानचा डाव दबावाखाली गेला. सलमान आगा याच्या निर्णयाने त्यांच्या संघाची वाट लावली. भारतीय फिरकी आणि वेगवान माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाज टिकूच शकले नाहीत. पाकिस्तानने कसाबसा 127 धावांचा टप्पा गाठला, पण हा स्कोर भारतासमोर काहीच नव्हता. भारताच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करून सामना एकतर्फी केल्यासारखं वाटू लागलं. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी शांत डोक्याने खेळ करत लक्ष्य सहज साध्य केलं. शेवटी 15.5 षटकांतच भारताने 3 गडी गमावत विजय मिळवला.