Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासूनच उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. सूर्या एकामागून एक रेकॉर्ड नावावर करत आहे. आता त्याने पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि सध्याचा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकण्याच्या बाबतीत मागे टाकलं आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकण्याच्या बाबतीत सूर्या चौथ्या क्रमांकावर आला आहे.


सूर्यकुमार यादव, शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान या तिन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एकूण 11 वेळा सामनावीराचा किताब पटकावला आहे. पण शाहिद आफ्रिदीने एकूण 99 सामन्यांमध्ये 11 सामनावीराचा किताब पटकावला आहे. याशिवाय मोहम्मद रिझवानने एकूण 80 सामन्यांमध्ये 11 वेळा सामनावीर ठरला आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवने मात्र केवळ 47 सामन्यांत 11 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. याशिवाय रोहित शर्माने 12 सामनावीर पुरस्कार मिळवले आहेत. रोहित शर्माने आतापर्यंत एकूण 148 सामन्यांमध्ये हा मान मिळवला आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी 13 सामनावीरांसह तर विराट कोहली 15 सामनावीर पुरस्कार मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.


सूर्याची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 


सूर्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 20 एकदिवसीय आणि 47 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या 18 डावांमध्ये त्याने आतापर्यंत 28.87 च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने दोन अर्धशतकं झळकावली आहेत. याशिवाय त्याने 45 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये 47.17 च्या सरासरीने आणि 175.64 च्या स्ट्राईक रेटने 1651 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 शतकं आणि 13 अर्धशतकं केली आहेत.


तिसऱ्या टी20 मध्ये खास रेकॉर्ड करु शकतो नावावर


सूर्याने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध एकूण 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 52 च्या सरासरीने आणि 151.16 च्या स्ट्राइक रेटने 260 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये टी20 आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक धावा करण्‍याच्‍या बाबतीत सूर्या 10 व्‍या क्रमांकावर आहे. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात सूर्या मोठी खेळी खेळून रॉस टेलर, केएल राहुल, टिम सेफर्ट, विराट कोहली आणि ब्रेंडन मॅक्युलम यांचे विक्रम मोडू शकतो. टी-20 आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक धावा करण्‍याच्‍या बाबतीत ब्रेंडन मॅक्‍कुलम 261 धावांसह 9व्या, विराट कोहली 311 धावांसह 8 व्‍या, टीम सेफर्ट 322 धावांसह सातव्या, केएल राहुल 322 धावांसह सहाव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर रॉस टेलर 349 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. पुढील सामन्यात शतक झळकावून सूर्या सर्व फलंदाजांचा विक्रम मोडू शकतो.


हे देखील वाचा-