Surya Kumar Yadav Stats : टी 20 मधील नंबर एक फलंदाज वनडेमध्ये मात्र फ्लॉप जातोय... भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याला वनडेमध्ये लौकिकास साजेशी फलंदाजी करता येत नाही. विश्वचषकाआधी सूर्यकुमार यादवची बॅट रुसल्याचे दिसतेय. मागील  18 वनडे डावात सूर्याला एकही अर्धशतक ठोकता आले नाही. १८ डावात 14.70 च्या सरासरीने फक्त 250 धावा करता आल्या आहेत. वनडेमध्ये सुर्यकुमार यादव याने अखेरचं अर्धशतक 9 फेब्रुवारी 2022 रोजी केले होते. त्यानंतर सूर्याला अद्याप अर्धशतक ठोकता आले नाही. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही सूर्याला मोठी खेळी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर मोक्याच्या क्षणी सूर्याने विकेट फेकली. शुभमन गिल परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी धावसंख्या हालती ठेवली. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. पण मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादव बाद झाला. सूर्यकुमार यादवने दोन चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने ३५ धावांचे योगदान दिले. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी ६५ धावांची भागिदारी केली. सूर्या पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. 
 
सूर्याचे आकडे काय सांगतात ?


वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत 35 धावा केल्या. पण आकडेवारी सांगते की सूर्यकुमार यादव वनडे फॉरमॅटमध्ये सतत फ्लॉप ठरत आहे. सूर्यकुमार यादवच्या शेवटच्या काही डावांमध्ये फ्लॉप गेलाय. सूर्याने श्रीलंकेविरुद्ध केलेली 40 धावांची खेळी सर्वोच्च खेळी आहे.  न्यूझीलंडविरुद्ध 31 आणि 14 धावा केल्या. न्यूझीलंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग ३ सामन्यात फ्लॉप गेला. आता विंडिजविरोधातही सूर्यकुमार यादवची बॅट शांतच आहे. 






खराब फॉर्मात सूर्या.....


वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेतही सूर्यकुमार यादवने निराशाजनक कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवने 19 धावा केल्या. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 24 धावा केल्या. यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने 35 धावांची इनिंग खेळली. वनडे फॉरमॅटमधील खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादव टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. यंदाचा विश्वचषक भारतात होणार आहे. मात्र सूर्यकुमार यादवची खराब कामगिरी अशीच सुरू राहिली तर विश्वचषक संघात स्थान मिळवणे सोपे नसेल.