Steve Smith Retirement: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटला अलविदा केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारताकडून पराभव झाल्यानंतर, स्टीव्ह स्मिथने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
भारताने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळून 73 धावांची खेळी केली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हे आव्हान भारताने 6 विकेट्सच्या मोबदल्यात पार करुन, फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं. दरम्यान, या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
स्टीव्ह स्मिथची एकदिवसीय कारकीर्द-
स्टीव्ह स्मिथची एकदिवसीय कारकीर्द शानदार राहिली आहे. स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी 170 सामन्यांमध्ये 5800 धावा केल्या आहेत. स्मिथने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये 12 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली आहेत. स्मिथचा सर्वोत्तम एकदिवसीय धावसंख्या 164 धावा आहे. स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी अनेक मोठ्या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स्मिथने भारताविरुद्धही चांगली कामगिरी केली आहे. पण आता त्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.