Steve Smith 34th Test Century : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीत स्टीव्ह स्मिथने कारकिर्दीतील 34 वे शतक झळकावले आहे. भारताविरुद्धचे कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे एकूण 11वे शतक आहे आणि सध्याच्या मालिकेतील त्याचे दुसरे शतक आहे. डावाच्या 101व्या षटकात नितीश कुमार रेड्डीला चौकार मारून त्याने आपले शतक पूर्ण केले. यासह तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.
मेलबर्न कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत स्टीव्ह स्मिथने 68 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी त्याने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने दुसऱ्या दिवशी आक्रमक शैलीत फटकेबाजी करत 167 चेंडूत 100 धावांचा टप्पा पार केला. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकारही मारले. स्मिथची मेलबर्नच्या मैदानावर भारताविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या 192 धावा आहे, जी त्याने 2014 मध्ये केली होती. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मिथ टॉप-10 मध्ये आला आहे.
भारताविरुद्ध सर्वाधिक शतके
टीम इंडियाविरुद्ध स्टीव्ह स्मिथ आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. टीम इंडियाविरुद्ध त्याच्या नावावर आता 11 शतके आहेत, त्याच्या आधी हा विक्रम इंग्लंडच्या जो रूटच्या नावावर होता ज्याने भारताविरुद्ध 10 शतके झळकावली आहेत. त्याच्याशिवाय रिकी पाँटिंग, गॅरी सोबर्स आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी भारताविरुद्ध 8-8 शतकी खेळी खेळली होती.
याशिवाय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत स्मिथने आता सुनील गावसकर, ब्रायन लारा, महेला जयवर्धने आणि युनूस खान यांची बरोबरी केली आहे. या सर्व दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये 34 शतकी खेळी खेळली होती. स्मिथचे हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 46 वे शतक आहे.
हे ही वाचा -