India vs Sri lanka, 3rd T20 : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या सुरू असलेली तीन सामन्यांची टी-20 मालिका दोन सामने झाल्यानंतर 1-1 अशी बरोबरीत आली आहे. भारतीय संघाने (Team India) पहिला सामना 2 धावांनी जिंकला होता. पण दुसऱ्या सामन्यात भारताला 16 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागले. आता मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 7 जानेवारीला म्हणजेच उद्या होणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) भारतीय संघासाठी मोठा धोका ठरू शकतो. श्रीलंकेला दुसरा टी-20 जिंकून देण्यात शनाकाने महत्त्वाची भूमिका बजावली.


दुसऱ्या टी-20 सामन्यात पाच विकेट पडल्यानंतर फलंदाजीला आलेला श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका याने आपल्या संघासाठी नाबाद अर्धशतकी खेळी खेळून श्रीलंकेला मजबूत स्थितीत आणले होते. श्रीलंकेने 15.5 षटकांत 138 धावांत पाचवी विकेट गमावली होती. यानंतर फलंदाजीला आलेल्या शनाकाने 22 चेंडूंत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 56 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 254.55 होता. त्याच्या या खेळीनंतर श्रीलंकेने 20 षटकांत 6 विकेट गमावून 206 धावा केल्या.


निर्णायक सामना भारताकडून हिसकावून घेणार का?


भारतीय संघाविरुद्ध शनाका अतिशय आक्रमक फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने भारतीय संघाविरुद्ध आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने प्रत्येक वेळी 30 धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि दोन अर्धशतकं झळकावली आहेत. शनाकाने आतापर्यंत भारताविरुद्ध पाच डावांत 205.64 च्या स्ट्राइक रेटने 255 धावा केल्या आहेत. त्याच्या पाच डावांत तो एकूण 4 वेळा नाबाद परतला आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याची ही आकडेवारी भारतीय संघासाठी धोकादायक ठरू शकते.


गोलंदाजीतही कमाल


विशेष म्हणजे फलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही शनाकाची पकड आहे. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना 21 धावा वाचवत शनाकाने संघाला 16 धावांनी विजय मिळवून दिला. अक्षर पटेल धडाकेबाज फलंदाजी करत असताना तो गोलंदाजीसाठी आला. अखेरच्या षटकात त्याने अक्षरला रनआऊट केले.


मालिकेत दोन्ही संघ बरोबरीत


भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर झाला. रोमहर्षक सामन्यात भारताने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला. पण दुसऱ्या सामन्यात पुण्याच्या एमसीएस मैदानात श्रीलंकेचा संघ 16 धावांनी जिंकला. ज्यामुळे दोन्ही संघानी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. 


हे देखील वाचा-