मुंबई : भारताच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न 23 नोव्हेंबर रोजी होणार होतं. मात्र, स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानं लग्न स्थगित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छल संदर्भात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. स्मृती मानधना हिनं या सर्व प्रकरणानंतर सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली आहे. ही पोस्ट लग्न किंवा लग्नाच्या तारखेसंदर्भात नसून एका टूथपेस्ट ब्रँडसाठी केलेला प्रमोशनल व्हिडीओ आहे. या पोस्ट कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी स्मृतीच्या हाताच्या बोटामध्ये साखरपुड्याची अंगठी नसल्याचा उल्लेख केला आहे.
Smriti Mandhana : स्मृती मानधनाकडून व्हिडिओ शेअर
स्मृती मानधनानं शेअर केलेला व्हिडिओ एका प्रसिद्ध टूथपेस्ट ब्रँडसाठीचा प्रमोशनल व्हिडीओ आहे. मात्र, चाहत्यांच्या नजरेतून एक गोष्ट सुटू शकली नाही ती म्हणजे स्मृती मानधनाच्या बोटांमध्ये त्यांना साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळाली नाही. काही फॅन्सच्या दाव्यानुसार हा व्हिडिओ लग्नाच्या तारखेच्या अगोदरचा आहे.तर, एका चाहत्याच्या दाव्यानुसार पलाश मुच्छलनं स्मृती मानधनाला प्रपोज करण्यापूर्वी व्हिडिओ शूट केला गेला असावा.
स्मृती मानधनानं लग्नासंदर्भात कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र, या पोस्टनंतर इन्स्टाग्राम यूजर्सकडून वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत.
पलाश मुच्छलची आई अमिता मुच्छल यांनी हिंदुस्तान टाइम्स सोबत बोलताना म्हटलं होतं की पलाश आणि स्मृती यांचं लग्न लवकरच होईल. त्यांनी हे देखील म्हटलं की लग्नाच्या दिवशी जे झालं त्यानं स्मृती आणि पलाश यांना निराशा आणि वेदनांचा सामना करावा लागला होता.
स्मृती मानधना लवकरच मैदानावर दिसणार
भारतीय महिला क्रिकेट संघानं वनडे वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीच्या लढतीत पराभूत करत भारतीय महिला क्रिकेट संघानं विजेतेपद मिळवलं होतं. त्या विजेतेपदासंदर्भात देखील स्मृतीनं पोस्ट केलेल्या व्हिडिओत मत व्यक्त केलं आहे. येत्या 21 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघामध्ये पाच सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे. या मालिकेच्या निमित्तानं स्मृती मानधना टीम इंडियाकडून खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर जानेवारी महिन्यात डब्ल्यूपीएलला सुरुवात होणार आहे. यामध्ये स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नेतृत्त्व करताना पाहायला मिळेल.