श्रेयस अय्यर... 200 धावा...


श्रेयस अय्यर...नाबाद 202 धावा...


ऑक्टोबर 2015 साली वानखेडे स्टेडियम आणि फेब्रुवारी 2017 मध्ये ब्रेबॉर्नवर श्रेयस अय्यरनं साकारलेल्या या मोठ्या खेळी. या दोन्ही इंनिंग मला आजही आठवतायेत. कारण स्कोरर म्हणून या दोन्ही इंनिंगचा मी साक्षीदार राहिलोय. आज कानपूर कसोटीत श्रेयसनं पदार्पणातच शतक ठोकलं. आणि या दोन्ही इंनिंगच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.


2015 मध्ये पंजाबविरुद्धच्या रणजी सामन्यात मी श्रेयसला पहिल्यांदाच खेळताना पाहिलं होतं. त्या सामन्यात श्रेयसनं 200 धावा केल्या. आणि मुंबईनं तो सामना जिंकला. 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता. योगायोगाची गोष्ट अशी की, कसोटी मालिकेआधी झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात स्कोरिंग करण्याची संधी मला एमसीएकडून मिळाली. ब्रेबॉर्न स्टेडियमवरच्या त्या सामन्यात भारत 'अ' संघाकडून खेळणाऱ्या श्रेयसनं ऑस्ट्रेलियाविरुध्द नाबाद 202 धावा केल्या होत्या.


या सामन्यातला एक किस्सा आहे. भारताच्या डावात एका बाजूला पडझड सुरु होती. पण दुसऱ्या बाजूला अय्यरच्या बॅटमधून धावांचा ओघ सुरुच होता. यावेळी स्लीपमधून वॉर्नर आणि स्टंपच्या मागून मॅथ्यू वेडचं स्लेजिंग सुरु केलं. पण अय्यरवर त्याचा जराही फरक पडला नाही. त्यानं नॅथन लायनला खणखणीत षटकार ठोकून आपलं द्विशतक साजर केलं आणि कांगारूंना चोख प्रत्युत्तर दिलं. याच इंनिंगमुळं अय्यरला भारतीय कसोटी संघात त्यावर्षी जागा मिळाली पण अंतिम अकरात त्याला खेळवण्यात आलं नाही.


खरं तर श्रेयसचं कसोटी पदार्पण खूपच लांबलं. चार वर्षांपूर्वी तो ज्या फॉर्ममध्ये होता, तेव्हाच त्याला पदार्पणाची संधी मिळायला हवी होती. राष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधल्या कामगिरीनं त्याला वनडे आणि टी-20 संघाची दारं खुली झाली. पण कसोटी संघात संधी मिळाली नव्हती. गेली चार वर्ष तो ज्या संधीच्या शोधात होता ती त्याला कानपूरमध्ये मिळाली. जिथं त्यानं आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीची सुरुवात केली होती. 


भारताचे महान फलंदाज सुनील गावस्करांकडून श्रेयसला कसोटी कॅप मिळाली. मुंबई क्रिकेटशी निगडित असलेल्या प्रत्येकासाठी तो अभिमानाचा क्षण होता. आणि श्रेयस अय्यरनं इतकी वर्ष बाळगलेल्या संयमाचं ते फळ होतं.


तो संयम श्रेयसनं पहिल्या दिवशी फलंदाजाला मोहात पाडणाऱ्या कानपूरच्या खेळपट्टीवरही दाखवला. आणि त्याच संयमानं पदार्पणातच कसोटी शतकही साजरं केलं. या कामगिरीनं त्याला प्रवीण अमरे, रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ या मुंबईकर शिलेदारांच्याच पंगतीत नेऊन बसवलं.


पण आता प्रश्न असा आहे की कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध श्रेयसनं केलेली ही इंनिंग त्याची कसोटी संघातली जागा पक्की करणार का? तर याचं उत्तर सध्यातरी नाही असच म्हणता येईल. कारण विराट कोहली संघात नसल्यानं श्रेयसला संधी मिळाली. आणि मुंबईतल्या दुसऱ्या कसोटीत विराट श्रेयसची जागा घेणार हे खरंय. त्यामुळे कसोटी संघातली आपली जागा पक्की करण्यासाठी श्रेयसला आणखी किती संयम बाळगावा लागणार हे पाहावं लागेल.


संबंधित ब्लॉग-