England vs India 3rd Test Day 3 Stumps : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून, भारताने पहिल्या डावात 387 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात इंग्लंडने दुसऱ्या डावात दिवसअखेर बिनबाद 2 धावा केल्या. झॅक क्रॉउली 2 धावांवर आणि बेन डकेट शून्यावर नाबाद आहेत. पण तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात हाय व्होल्टेज ड्रामाची भर पडली.

लॉर्ड्सवर शेवटच्या ओव्हरमध्ये राडा!

सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जे घडलं, ते सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अखेरच्या सत्रात इंग्लंडच्या फलंदाजांनी वेळ वाया घालवायचा होता. त्यामुळे ते वारंवार क्रीज सोडून बाहेर जात होते, ज्यामुळे खेळाचा वेग मंदावला. भारतीय खेळाडूंनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. क्रॉउलीचा टाइमपास पाहून शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज दोघेही चांगलेच चिडले. त्यांनी मैदानातच क्रॉउलीशी शाब्दिक वाद घातला. सामना संपल्यानंतरही तणाव कायम राहिला आणि तिघांमध्ये उघडपणे खडाजंगी झाली. या सगळ्या घडामोडींमुळे तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस सामना आणखीनच रंगतदार बनला असून, चौथा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 

राहुलचं शतक, रवींद्र जडेजाचं अर्धशतक

तिसऱ्या दिवशी, भारताने 145/3 वरून खेळायला पुढे सुरूवात केली. केएल राहुल आणि पंत यांच्यात एकूण 141 धावांची भागीदारी झाली, दरम्यान, पंत निष्काळजीपणे धावत असताना 74 धावांवर धावबाद झाला. त्याच्या नंतर काही वेळातच, केएल राहुल देखील बाद झाला, ज्याने शतक पूर्ण केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर आपली विकेट गमावली. राहुल 100 धावा केल्यानंतर बाद झाला. भारताचा अर्धा संघ 254 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता, परंतु टीम इंडिया फलंदाजी क्रमवारीत सखोल नियोजनासह खेळत आहे.

अशा परिस्थितीत नितीश कुमार रेड्डी आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून सहाव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. नितीशची विकेट पडल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजा यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. सुंदर आणि जडेजा यांच्यात 50 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे असे वाटत होते की टीम इंडिया 400 धावांचा टप्पा ओलांडेल. रवींद्र जडेजा 72 धावा करून बाद झाला.

11 धावांत गमावल्या उर्वरित 4 विकेट

त्यानंतर भारताने 376 धावांवर सातवा विकेट गमावला. म्हणजेच, एका वेळी 387 धावांवर 6 विकेट गमावल्यानंतर, भारतीय संघाने पुढील 11 धावांत उर्वरित 4 विकेट गमावल्या. सुंदरने 23 धावा केल्या आणि शेवटी मोठा शॉट खेळून आऊट झाला. आता लॉर्ड्स कसोटी एकदिवसीय सामन्यासारखी झाली आहे, कारण तीन दिवसांच्या खेळानंतरही दोन्ही संघ बरोबरीत आहेत आणि शेवटचे दोन डाव लॉर्ड्स कसोटीचा निकाल ठरवतील.