Shreyas Iyer Ind vs Eng 4th T20 : भारताचा टी-20 कर्णधार श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी कायम आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह भारताने मालिका गमावली असून अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला सलग सहाव्या टी-20 सामन्यातही विजय मिळवता आलेला नाही. या पराभवानंतर अय्यर स्पष्टपणे नाराज दिसला. इंग्लंडने भारताने दिलेले 159 धावांचे आव्हान सहज पार केले. भारतीय फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले, तर गोलंदाजांनाही इंग्लिश फलंदाजांना रोखता आले नाही. सामन्यानंतर बोलताना अय्यरने संघाच्या चुका स्पष्टपणे मांडल्या.

Continues below advertisement

'योजना होत्या, पण अंमलबजावणी झाली नाही..'

पराभवानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, "हा निकाल आमच्यासाठी पुन्हा एकदा निराशाजनक आहे. 158 धावा हा अजिबात जिंकण्याजोगा स्कोअर नव्हता. इंग्लंडने किती सहज आणि वेगाने धावांचा पाठलाग केला, हे सर्वांनी पाहिले. गोलंदाजीला उतरताना मी गोलंदाजांना एकाच लेंथवर सातत्याने मारा करण्यास सांगितले होते. ऑफ स्टंप तसेच मिडल-लेगच्या लाईनवर चेंडू टाकल्यास फलंदाजांना शॉट मारणे कठीण जात होते. मात्र आम्ही आमच्या योजनांची योग्य अंमलबजावणी करू शकलो नाही. त्याचीच किंमत आम्हाला मोजावी लागली."

Continues below advertisement

80 धावांची खेळी, तरीही अय्यर समाधानी नाही

या सामन्यात भारतीय डाव कोसळत असताना कर्णधार श्रेयस अय्यरने एका बाजूने झुंज दिली. त्याने 49 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 80 धावांची दमदार खेळी केली. मात्र स्वतःच्या खेळीवरही तो समाधानी नव्हता. याबाबत तो म्हणाला, "वैयक्तिक कामगिरीबद्दल मला आनंद आहे. पण त्या खेळीमुळे संघाला विजय मिळत नसेल, तर त्या धावांना फारसा अर्थ राहत नाही."

सलग पराभवांबाबत बोलताना अय्यरने संघ अजून तयार होतं असल्याचे सांगितले. "सध्या आम्ही संक्रमणाच्या टप्प्यातून जात आहोत. या काळात चुका होणारच. पण त्या चुका लवकर सुधारून परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे महत्त्वाचे आहे. आमच्या संघात शिकण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत. ते आपल्या कामगिरीचे विश्लेषण करून पुढील सामन्यांत नक्कीच सुधारणा करतील, असा मला विश्वास आहे."

सलग सहा सामन्यांत विजयाचा दुष्काळ

श्रेयस अय्यरला पहिल्यांदाच भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली भारताला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. आयर्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्धही भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत सातत्याने अपयश आल्याने संघ व्यवस्थापनासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हे ही वाचा -

Eng vs IND 4th T20 : श्रेया मोठा गेम झाला रे... ना वैभव, ना अभिषेक, ना कोणता गोलंदाज चालला! आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडनेही टीम इंडियाची अब्रू काढली, कर्णधार अय्यरने सलग दुसरी मालिका गमावली