WTC Final 2023 : आयपीएल सुरु असतानाच टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. होय... श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असून त्याला सर्जरी करावी लागणार आहे. त्यामुळे अय्यर आयपीएलला मुकणार तर आहेच. त्याशिवाय जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधूनही बाहेर पडला आहे.  ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. पण त्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे.  


श्रेयस अय्यर आयपीएलच्या अखेरीस काही सामन्यासाठी उपलब्ध असू शकतो, अशी चर्चा होती. मात्र, सर्जरी करणार असल्यामुळे संपूर्ण हंगमात अय्यर खेळणार नाही. तसेच जून महिन्यात होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही अय्यर खेळू शकणार नाही. हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरच्या पाठिची सर्जरी करण्यात येणार आहे. त्यासाठी अय्यर लवकरच परदेशात जाणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तीन महिन्याचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर क्रिकेटचा सराव सुरु करु शकतो. 


दुखापतीमुळे आधी जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहेत. त्याशिवाय ऋषभ पंतही आणखी सहा ते सात महिने मैदानावर परतणार नाही. या दोन धक्क्यातून टीम इंडिया सावरत नाही, तोपर्यंत श्रेयस अय्यरचा मोठा झटका बसला आहे. अय्यर सर्जरी करण्यासाठी परदेशात जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेतील अखेरचा कसोटी सामना दुखापतीमुळे श्रेयस अय्यर खेळला नव्हत. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातही श्रेयस अय्यरला पाठदुखीचा त्रास झाला होता, त्यामुले तो टीम इंडियाच्या बाहेर गेला होता. आता पुन्हा एखदा तीच दुखापत बळावली आहे. 






ICC WTC Final 2023 : भारतीय क्रिकेट संघाने  (Team India) 13 मार्च रोजी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेविरुद्धच्या क्राइस्टचर्च कसोटीत न्यूझीलंडने सामन्यातील शेवटच्या चेंडूवर विजय मिळवताच, टीम इंडिया कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. विशेष म्हणजे भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी, टीम इंडियाने 2019-21 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती. 


टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर 


आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम फेरीत प्रवेश केलेला भारतीय संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाच्या विजयी गुणांची टक्केवारी 58.8 टक्के आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी टीम इंडियाच्या मार्गात अनेक चढउतार आले. मात्र भारताने सर्व वादळांवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली. ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामात, भारताने 18 कसोटी सामने खेळले ज्यात टीम इंडियाने 10 जिंकले आणि 5 सामने गमावले. दरम्यान, तीन कसोटी अनिर्णित राहिल्या. आता टीम इंडियाचा WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून दोन्ही संघांमधील विजेतेपदाची लढत होणार आहे.