Ishan Kishan Vs Shreyas Iyer : विश्वचषकात श्रेयस अय्यर याला अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. लखनौच्या मैदानात इंग्लंडविरोधात पुन्हा एकदा बाऊन्सर चेंडूवर बाद झाला. सहा सामन्यात अय्यरला फक्त एकच अर्धशतक ठोकता आलेय. इंग्लंडविरोधात संघ अडचणीत असताना श्रेयस अय्यरने हाराकिरी करत विकेट फेकली. विराट कोहली आणि शुभमन गिल लवकर तंबूत परतल्यामुळे रोहित शर्माच्या साथीने डाव सावरण्याची जबाबदारी होती. पण गरज नसताना अय्यरने विकेट फेकली. अय्यर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर ईशान किशनला संधी द्या, या मागणीने जोर धरला.ईशान किशन भन्नाट फॉर्मात असतानाही त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळत नाही, असा सूर नेटकऱ्यांनी धरला आहे. ईशान किशन याने वनडे क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. त्याचे आकडे सर्व काही सांगतात... 


विश्वचषकात ईशान किशनची कामगिरी कशी राहिली  ?


श्रेयस अय्यर याची विश्वचषकातील सुरुवातच खराब झाली होती. चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात अय्यरला खातेही उघडता आले नव्हते. अफगाणिस्तानविरोधात अय्यरने 23 चेंडूत नाबाद 25 धावांची खेळी केली होती. पाकिस्तानविरोधात अय्यरने अर्धशतक ठोकले होते. पाकिस्तानविरोधात अय्यरने 62 चेंडूमध्ये 53 धावा करत नाबाद राहिला होता. बांगलादेशविरोधात चांगली सुरुवात मिळाली पण मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पुण्यात अय्यरने 25 चेंडूत 19 धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडविरोधातही अय्यरला सुरुवात मिळाली पण मोठी धावसंख्या करता आली नाही. धरमशालाच्या मैदानात अय्यरने 29 चेंडूमध्ये 33 धावा केल्या होत्या. आता इंग्लंडविरोधात 16 चेंडूत फक्त चार धावा करता आल्या.  


श्रेयस अय्यर आणि ईशान किशन... काय सांगतात दोघांचे आकडे ?


ईशान किशन याने भारतासाठी 27 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 933 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 42.41 आणि स्ट्राइक रेट 102.19 इतका आहे. वनडेमध्ये ईशान किशन याने द्विशतकही ठोकलेय. त्याशिवाय एक शतकही त्याच्या नावावर आहे. सात अर्धशतकेही ठोकली आहेत. श्रेयस अय्यर याने 53 वनडे सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामध्ये त्याने  1935 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन शतके ठोकली आहेत.अय्यरने 15 अर्धशतकेही लगावली आहेत.