नवी दिल्ली : वर्ल्डकपमध्ये अपेक्षित कामगिरी न झाल्याने पाकिस्तान संघावर सडकून टीका होत आहे. करो वा मरोच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय टप्प्यात असतानाही अंपायर काॅलने घात झाल्यानंतर पाकिस्तानचे आव्हान स्पर्धेतून संपल्यात जमा आहे. त्यामुळे पाकिस्तान टीम आणि कॅप्टन बाबर आझम टीकाकारांच्या रडारवर आला आहे. बाबर आझमच्या बचावात्मक पवित्र्यावर, कॅप्टनसीवरही टीका केली जात आहे.
असे असतानाही बाबर आझमने टीम इंडियाचा किंग विराट कोहली आणि कॅप्टन रोहित शर्माची भरभरून प्रशंसा केली आहे. दोन्ही खेळाडू का पसंत आहेत याचीही त्याने कारणमीमांसा केली आहे. सडकून टीका होत असताना बाबरने रोहित शर्मा आणि विराट कोहली का आवडतात हे सांगितलं.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि केन विल्यमसन आवडते फलंदाज
बाबर आझमने भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सवर विराट आणि रोहितबद्दल चर्चा केली. बाबर म्हणाला, “विराट कोहली, रोहित शर्मा आणि केन विल्यमसन हे माझे आवडते फलंदाज आहेत. हे तिघे जगातील अव्वल खेळाडू आहेत. हे तिघे परिस्थिती आणि परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेतात, म्हणूनच मला ते आवडतात.
पाकिस्तानच्या कर्णधाराने पुढे सांगितले की त्याला रोहित आणि विराट इतके का आवडतात. बाबर म्हणाला, विराट, रोहित आणि केन विल्यमसनची एक गोष्ट मला सर्वात जास्त आवडते ती म्हणजे ते संघाला कठीण परिस्थितीतून कसे बाहेर काढतात आणि चांगल्या गोलंदाजांविरुद्धही सहज धावा करतात. या तिघांकडून मी हेच शिकण्याचा प्रयत्न करतो.
वर्ल्डकप 2023 मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही शानदार फॉर्मात आहेत. भारताकडून आतापर्यंत कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 5 सामन्यात 118 च्या सरासरीने 354 धावा केल्या आहेत. त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर रोहित शर्माच्या नावावर 5 सामन्यात 311 धावा आहेत. त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्याचवेळी बाबर आझमने 6 सामन्यात केवळ 207 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 34 आहे आणि स्ट्राइक रेट 79 आहे आणि ही त्याची सर्वात मोठी कमजोरी आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंत विश्वचषकात खेळल्या गेलेल्या 6 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर 4 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या