India vs Pakistan, Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दोन सप्टेंबर रोजी पल्लेकेले स्टेडिअमवर सामना झाला होता. या सामन्यावेळी भारत आणि पाकिस्तान खेळाडूंमध्ये दोस्ताना पाहायला मिळाला होता. हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. पण खेळाडूमध्ये मैत्रीचे वातवरण पाहून भारताचा माजी कर्णधार गौतम गंभीर चांगला भडकला होता. सामन्यादरम्यान खेळाडूंनी फक्त खेळावर लक्ष द्यायला हवे, तुम्ही तुमची मैत्री मैदानाच्या बाहेर ठेवायला हवी, अशी प्रतिक्रिया गौतम गंभीर याने दिली होती. गौतम गंभीरच्या या प्रतिक्रियेला पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहीद आफ्रिदीने उत्तर दिलेय. 


गौतम गंभीर  काय म्हणाला होता ?


गौतम गंभीर याने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंच्या मैत्रीपूर्ण व्यवहारावर टीका केली होती. तो म्हणाला होता की, जेव्हा तुम्ही देशाचे प्रतिधिनित्व करत असता तेव्हा प्रतिस्पर्धी संघातील खेळांडूसोबत मस्करी करु शकत नाही. असे यापूर्वी कधी पाहिले नाही. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये आक्रमकपणा असायला हवा. सामन्यानंतर तुम्ही कितीही मैत्री ठेवू शकता, पण सामन्यात तु्म्ही देशाचे प्रतिधिनित्व करता, हे लक्षात ठेवायला हवं. 


शाहीद आफ्रिदी काय म्हणाला ?


गौतम गंभीरच्या वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आहे. या विषयावर प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात, मी वेगळ्या पद्धतीने विचार करतो. आपल्या सर्वांचे जगभरात चाहते असतात, त्यामुळे आपल्याला प्रेम आणि सन्मानचा संदेश द्यायला हवा. मैदानात आक्रमक राहायला हवे, पण मैदानाच्या बाहेर आपले जीवन आहे. 


सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना - 


आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा एकदा सामना होणार आहे. 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोलंबो येथे लढत होणार आहे. या सामन्याकडे पुन्हा एकदा चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. पाकिस्तानचे गोलंदाज आणि भारताची फलंदाजी, असा सामना पाहायला मिळणार आहे. शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या पाकिस्तानच्या तिकडीसमोर विराट-रोहित कशी फलंदाजी करणार... हे पाहणं औत्सुक्याचे आहे. साखळी सामन्यात शाहीन आफ्रिदीने विराट आणि रोहितला बाद केले होते.  याचा बदला रोहित-विराट घेणार का?