Shahid Afridi on Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये टी20 विश्वचषकावर नाव कोरले. रोहित शर्माच्या नेतृत्वाचं जगभरातून कौतुक होतेय. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिन आफ्रिदी यानेही रोहित शर्मावर कौतुकाची थाप टाकली आहे. पण त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्यावर निशाणा साधलाय. कुठे रोहित शर्मा आणि कुठे तू... असे म्हणत शाहिद आफ्रिदीने बाबरवर टीका केली. टी20 विश्वचषकात बाबरच्या नेतृत्वातील पाकिस्तानला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. साखळी फेरीतच पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आलेय. अमेरिकासारख्या नवख्या संघानेही पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे पाकिस्तानवर सातत्याने टीका होत आहे. त्यामध्ये आता शाहिद आफ्रिदीनेही समाचार घेतला आहे. आफ्रिदीने दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक केले असून बाबर आझमवरही निशाणा साधला आहे.  


मुलाखतीत शाहिद आफ्रिदीने रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक तर केलेच. तो म्हणाला, " कर्णधाराची भूमिका नेहमीच महत्वाची असते. त्याच्या खेळण्यावर, वागण्यावर संघाची स्थिती समजते. कर्णधाराला आपल्या संघासाठी नवे मापदंड तयार केले पाहिजेत. संघासाठी हवे असणारे योग्य ते बदल कर्णधाराने करायला हवेत. उदाहरण म्हणून रोहित शर्माचेच नाव घ्या ना...रोहितचा खेळ आणि त्याची खेळण्याची शैली बघा. रोहित शर्मा सलामीला आक्रमक फलंदाजी करत होता. वेगाने धावा जमवत होता. त्यामुळेच मधल्या फळीतील फलंदाज आत्मविश्वासाने फलंदाजी करत आहेत. म्हणूनच कर्णधाराची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते यावर माझा नेहमीच विश्वास आहे."



रोहित शर्मा अन् बाबर आझमची तुलना - 


टी20 विश्वचषक 2024 मध्ये रोहित शर्माने वादळी फलंदाजी केली. बाबर आझम आणि रोहित शर्माची तुलनाच होऊ शकत नाही. बाबर आझम यानं संपूर्ण स्पर्धेत संथ फलंदाजी केली. त्याला धावा जमवता आल्या नाहीत. षटकारही मारता आले नाही. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानची कामगिरी खराब झाली. त्यांना साखळी फेरीतून पुढेही जाता आले नाही.दुसरीकडे रोहितच्या नेतृत्वातील टीम इंडिया स्पर्धेत अजय राहिली. रोहित शर्मानेही धावांचा पाऊस पाडला. स्पर्धेतील सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात रोहित दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने 8 डावात 3 अर्धशतकांसह 257 धावा केल्या. रोहितयाचा स्ट्राइक रेट 156 पेक्षा जास्त होता. दुसरीकडे, बाबरने या स्पर्धेत 4 सामने खेळले, ज्यामध्ये त्याला 122 धावा करता आल्या. त्याची सरासरी 40 होती. पण स्ट्राईक रेट फक्त 101 इतकाच राहिला. त्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली.