T20 World Cup 2024 England Super 8 : रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडचा पाच विकेटने धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर स्कॉटलँडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय, तर इंग्लंडने सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. इंग्लंडने आपल्या आखेरच्या साखळी फेरीत नामिबियाचा दारुण पराभव केला होता. आज ऑस्ट्रेलियाने अखेरच्या षटकात स्कॉटलँडचा पाच विकेटने पराभव केला. ट्रेव्हिस हेड आणि मार्कस स्टॉयनिस यांच्या झंझावती खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडचा धुव्वा उडवला.


स्कॉटलँडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात


इंग्लंड टी20 विश्वचषकात ब गटामध्ये आहे. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलियाने याआधीच सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला होता. आता इंग्लंडनेही क्वालिफाय केले आहे. इंग्लंडने चार सामन्यात दोन विजय मिळवलेत, तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. इंग्लंडने चार सामन्यात पाच गुणांची कमाई केली. त्यांनी दोन सामने मोठ्या फरकाने जिंकल्यामुळे नेटरनरेट +3.611 इतका शानदार झाला. दुसरीकडे स्कॉटलँडनेही चार सामन्यात दोन विजय मिळवले, एक सामना पावसामुळे रद्द झाला अन् एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण रनरेट इंग्लंडपेक्षा खराब आहे. त्यामुळे स्कॉटलँडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 


ऑस्ट्रेलियाने स्टॉटलँडचा धुव्वा उडवला 


ऑस्ट्रेलियाविरोधात स्कॉटलँडने शानदार खेळ केला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलँडने 180 धावा फलकावर लावल्या होत्या. कर्णधार ब्रँडन मॅक्युलम यानं शानदार फलंदाजी केली. त्याने 34 चेंडूमध्ये 60 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीमध्ये त्याने दोन चौकार आणि सहा षटकार ठोकले. प्रत्युत्तरदाखल ऑस्ट्रेलियाने 19.4 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात आव्हान सहज पार केले. ऑस्ट्रेलियासाठी मार्कस स्टॉयनिस आणि ट्रेव्हिस हेड यांनी मॅच विनिंग खेळी केली. ट्रेव्हिस हेड याने 49 चेंडूमध्ये 68 धावांचा पाऊस पाडला. तर मार्कस स्टॉयनिस याने 29 चेंडूत 59 धावांची खेळी केली. त्याशिवाय टिम डेव्हिड याने 24 धावांचे महत्वाचे योगदान दिले. 


इंग्लंडचं टी20 विश्वचषकातील प्रदर्शन 


टी-20 विश्वचषक 2024 मध्ये इंग्लंडने पहिला सामना स्कॉटलंडविरुद्ध खेळला होता. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतर इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियासोबत झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 36 धावांनी दारुण पराभव केला. या पराभवानंतर इंग्लंडच्या संघावर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची वेळ आली होती. पण इंग्लंडने पुढील दोन्ही सामन्यात मोठा विजय मिळवला.  इंग्लंडने तिसरा सामना ओमानविरुद्ध खेळला, हा सामना 8 विकेटने जिंकला. त्यानंतर इंग्लंडने नामिबियाविरुद्धही मोठा विजय नोंदवला. डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून नामिबियाचा 41 धावांनी पराभव केला.