नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्धच्या सामन्यांसाठी भारत अ संघाची काल घोषणा करण्यात आली. रिषभ पंतला कर्णधार करण्यात आलं तर साई सुदर्शन याला उपकर्णधार करण्यात आलं. टीम इंडियाचा खेळाडू सरफराज खानन याला भारत अ संघात स्थान न मिळाल्यानं नव्या वादाला सुरुवात झाली आहे.एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरफराज खान याला संघात स्थान न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली होती. सरफराज खान याला भारत अ संघात स्थान का मिळालं नाही, असा सवाल त्यांनी केला होता. काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला एक प्रश्न विचारला आहे. 

Continues below advertisement

काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी सरफराज खानला भारत अ संघात स्थान न मिळाल्यानं टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला प्रश्न विचारले आहेत. शमा मोहम्मद यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं की "सरफराज खान याला त्याच्या आडनावामुळं निवडलं जात नाही का? फक्त विचारतेय, या प्रकरणी गौतम गंभीरची भूमिका माहिती करुन घ्यायची आहे."   

Continues below advertisement

सरफराज खान यानं नोव्हेंबर 2024 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. सरफराज खान यानं 17 किलो वजन कमी केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर गावसकर ट्रॉफीत त्याला संघात निवडलं गेलं होतं. मात्र, प्रत्यक्ष प्लेईंग 11 मध्ये त्याला संधी मिळाली नव्हती. त्यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात ही त्याला संधी मिळाली नव्हती.

दरम्यान, काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी यापूर्वी रोहित शर्माच्या फिटनेस संदर्भात एक पोस्ट केली होती. त्यानंतर वाद झाल्यानं ती पोस्ट शमा मोहम्मद यांनी डीलिट केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये  रोहित शर्मानं 76 धावा करताच शमा मोहम्मद यांनी रोहितचं कौतुक केलं होतं. 

उत्तर प्रदेश सरकारमधील माजी अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मोहसीन रजा यांनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या निवडीला राजकारणाशी जोडू नका, असं ते म्हणाले. मोहसीन रजा यांनी म्हटलं की यावर राजकारण करु नये, ते इंडिया टुडेसोबत बोलत होते. या तथाकथित नेत्यांनी खेळाडूंच्या भविष्यासोबत खेळू नये. मोहम्मद शमी खेळतो, मोहम्मद सिराज खेळतो, राजकारण करणं चुकीचं आहे, असं ते म्हणाले. 

टीम इंडियाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी गेल्या महिन्यात वेस्ट इंडिज मालिकेत सरफराज खानला दुखापतीमुळं संधी न मिळाल्याचं म्हटलं. सरफराज खानला क्वाड्रिसेप्स दुखापत झाली होती. ज्यामुळं तो दलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफीत खेळला नव्हता.

सरफराज खानला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाच कसोटीत संघात स्थान मिळालं नव्हतं. इंग्लंड दौऱ्यात त्याला संधी न मिळाल्यानं प्रश्न निर्माण झाले होते. दरम्यान सरफराज खान यानं इंग्लंडमध्ये केंटरबरीत इंग्लंड लॉयन्स विरुद्ध भारत अ संघांकडून 92 धावांची खेळी केली होती.त्यानंतर त्यानं इंट्रा स्क्वॉड मॅचमध्ये शतक केलं होतं.